लोकसभा उमेदवारी विषयी जाहिरपणे होणारे आरोप,प्रत्यारोप टाळावेत
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे यांचे आवाहन
नाशिक,दि,२० मार्च २०२४ –राज्यात शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,रिपाई या दिग्गज पक्षानी एकत्र येत महायुती तयार केली आहे. देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविणे हे महायुतीचे ध्येय आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून खासदारकीचा उमेदवार आमच्याच पक्षाचा असावा यावरून महायुतीच्याच पदाधिकाऱ्यांकडून आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. यामुळे मतदारांच्या मनात महायुतीची प्रतिमा मलीन होत असून मतदारांपर्यंत चुकीचा मेसेज जाऊ लागला आहे. लोकसभेच्या उमेदवारीविषयी महायुतीतील सर्वच घटक पक्षांमधील पदाधिकाऱ्यांनी जाहीररित्या वक्तव्य करू नयेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजितदादा पवार यांनी एकत्र येत महायुतीची मोट बांधली आहे.महायुतीच्या माध्यमातून राज्यात लोकाभिमुख निर्णय वेगाने होऊ लागले आहेत. देशासह राज्याचा विकास जलद गतीने होऊन सक्षम भारताच्या निर्मितीसाठी देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्रजी मोदी यांनाच विराजमान करण्यासाठी वरील नेते झटत आहेत. याकामी राज्यातील ४८जागांपैकी ४५ जागा जिंकण्याच्या उद्देशाने महायुतीचे नेते,पदाधिकारी कामाला लागले आहेत. असे असले तरी नाशिक लोकसभेची जागा आमच्याच पक्षाला मिळावी यावरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून उघडपणे हेवे-दावे आणि आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत.
यामुळे मतदारांमध्ये महायुती विषयीची प्रतिमा मलिन होऊ लागली असून उमेदवाराच्या विजयासाठी हे चित्र घातक ठरण्याची शक्यता आहे.उमेदवारी विषयी महायुतीचे नेते योग्य तो निर्णय घेणार घेणार आहेत. पुढील काळातही विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती आदी निवडणुकीतही एकत्रितपणे महायुतीला सामोरे जावे लागणार असल्याचे लक्षात ठेवून कोणीही पदाधिकाऱ्यांनी लोकसभा उमेदवारी विषयी जाहीरपणे वाचता करू नयेत असे आवाहन महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे यांनी केले आहे.