नाशिक – सिटी NCPA या नामांकित संस्थेतर्फे संगीत क्षेत्रातील ख्याल, धृपद, वाद्यवादन यामध्ये कलाकारांना ऑडिशन द्वारे दोन वर्षांकरिता शिष्यवृत्ती देऊन सन्मानित केले जाते.यावर्षी NCPA सिलेक्शन कमिटीने आपल्या नाशिकच्या सुरश्री दसककर हिची हार्मोनियम वादनाकरिता संपूर्ण भारतातून एकमेव शिष्यवृत्तीसाठी निवड केली आहे.
सुरश्री संगीत क्षेत्रात महत्वाचे योगदान असणाऱ्या दसककर घराण्यातील चौथी पिढी.तिची सांगीतिक तालीम तिचे वडील व गुरू सुप्रसिद्ध संवादिनी एकलवादक पं सुभाष दसककर यांच्याकडे सुरू आहे. तिला या आधी भारत सरकारतर्फे मानाची CCRT शिष्यवृत्ती मिळाली आहे.
सुरश्री आकाशवाणीची मान्यताप्राप्त कलाकार आहे. तिने भारतभर अनेक संगीतमहतोत्सवांमध्ये, रेडिओ व टीव्ही चॅनल्सवर विविध मान्यवरांसमोर आपली कला सादर केली आहे आणि त्यांचे कौतुक व आशीर्वाद मिळविले आहेत.अनेक पुरस्कारांनी तिला सन्मानित केले आहे. तिची आई सीमा व संपूर्ण दसककर परिवाराचे यामध्ये योगदान आहे असे तिला वाटते. ही कलाकार व सर्व नाशिककर रसिकांसाठी अभिमानाची बाब आहे.