मुंबई,दि,२ एप्रिल २०२४ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आठ उमेदवारांची पहिली यादी २८ मार्च रोजी जाहीर केली. पण त्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. हिंगोलीचे हेमंत पाटील आणि हातकणंगल्याचे धैर्यशील माने यांची उमेदवारी मागे घेण्यात येणार असल्याच्या बातम्या आहेत.तर भावना गवळी,हेमंत गोडसे यांच्या उमेवारीवरून तिढा आहे.आता शिंदे गटाच्या विद्यमान सहा खासदारांचा पत्ता कट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात आता मोठं महाभारत घडण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली यादी जाहीर केल्या नंतर त्यामधील हेमंत पाटील आणि धैर्यशील माने यांच्या नावाला भाजपचा असलेला विरोध लक्षात घेता त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार आले होते. त्यामधीलच भावना गवळी,हेमंत पाटील,धैर्यशील माने,हेमंत गोडसे या चार जणांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. तर रामटेकच्या कृपाल तुमाने यांची उमेदवारी या आधीच कापण्यात आली आहे.अडचणीच्या काळात ठाकरेंची साथ सोडून आपण तुमच्यासोबत आलो, पण आता उमेदवारीसाठीही झगडावं लागतंय अशी भावना सध्या या खासदारांची आहे. त्यामुळे ज्यांच्या नावावर भाजपकडून फुली मारण्यात आली आहे ते विद्यमान खासदार एकनाथ शिंदेंवर नाराज आहेत.
पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेल्या आठपैकी सात खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये रामटेकच्या कृपाल तुमाने यांची उमेदवारी या आधीच कापण्यात आली आहे. तर लोकांच्या असलेल्या नाराजीच्या अहवालाचा संदर्भ देत हिंगोलीतील हेमंत पाटील आणि हातकणंगल्यातील धैर्यशील मानेंच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला आहे.धैर्यशील माने यांच्या जागेवर त्यांच्या आई निवेदिता माने यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येतेय.त्यामुळे यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट आपोआप कापण्यात शक्यता आहे.भावना गवळी या यवतमाळमधून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.