नाशिक,दि,६ एप्रिल २०२४ –नाशिककरांच्या श्रद्धेचा,जल्लोषाचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथ आणि गरुड रथाच्या मिरवणुकी निमित्त,श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळातर्फे श्री.गरुड रथ उत्सवाच्या कामकाजात संदर्भातील बैठक नुकतीच शौनकआश्रम पंचवटी येथे आयोजित करण्यात आली होती.श्री काळाराम संस्थान, मंदिर प्रशासनासह अहिल्याराम व्यायामशाळेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रथाची डागडुजी सुरू असून संस्थान चे विश्वस्त, मंदिराचे पुजाधिकारी आणि व्यायाम शाळेचे पदाधिकारी रथाची तांत्रिक चाचणी घेत आहेत.त्यामध्ये योग्य ती सुधारणा देखील करत आहेत.बैठकीत रथ मिरवणुकीचा मार्ग,
रस्त्याची परिस्थिती, रथाच्या मार्गात लागणारी वाहने, गरुड रथाचे परीक्षण, रथ सजावटीचे काम, पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना द्यावयाची निवेदने, सुरक्षा व्यवस्था, रथाचे लाइटिंग,ब्रेक सिस्टीम, साउंड सिस्टीम, मार्गावरील मध्यभागी असणारे दिशादर्शक पांढरे पट्टे, रथ सेवकांचा युनिफॉर्म, अहिल्या राम तालमी जवळची साफसफाई,लाईट,आणि रथ यात्रे दरम्यान येणाऱ्या अडचणी यांसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.यावेळी श्री अहिल्याराम व्यायाम शाळेचे सर्व पदाधिकारी, युवा प्रतिनिधी आणि बलोपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.