नाशिक,दि, १९ एप्रिल २०२४ –नाशिक लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शना नुसार महायुती कडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत्ते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीच उमेदवारी करावी अशा सूचना आल्या नंतर ही आज अचानक भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेतली आहे.असे जाहीर केल्याने आता नाशिकच्या जागेवर शिवसेना शिंदे गटालाच ही जागा मिळणार हे निश्चित झाले आहे.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत असले तरी शिवसेना नेते अजय बोरस्ते यांचे नाव आता चर्चेत आहे. या बाबतचा फैसला उद्या होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे.
उद्या दुपारी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नाशिकच्या उमेदवाराची घोषणा होणार असल्याचे समजते आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन करत आपल्यालाच उमेदवारी मिळावी या अनुषंगाने हालचाली केलेल्या होत्या. मुंबईत येत त्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत आपल्याला जर उमेदवारी मिळाली तर आपण विजय होऊ असा शब्द दिला होता. मात्र मोदींच्या ४०० पार घोषणेनंतर विजय हा एकमेव निकष असल्याकारणास्तव हेमंत गोडसे यांचे नाव मागे पडले. त्याच भर म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघात त्यांच्या विरोधात सर्वजण एकत्र आले.
हेमंत गोडसे यांचे नाव मागे पडत असल्याने राष्ट्रवादीला ही जागा मिळावी, असा प्रस्ताव छगन भुजबळ यांनी महायुतीत मांडला होता. त्या अनुषंगाने त्यांनी मतदारसंघांमध्ये जनसंपर्क आणि दौरे सुरू केलेले होते.पण आज शुक्रवारी दुपारी भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
हेमंत गोडसेच नाशिकमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत अशी घोषणा काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी जरी केली असली तरी अजय बोरस्ते यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांची पसंती असल्याने उद्यापर्यंत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल,असे खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे.रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये नारायण राणेंच्या उमेदवारीनंतर आता अजय बोरस्ते यांच्या नावाची घोषणा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना धक्का देणार का?याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
हेमंत गोडसे याना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी नाकारल्यास गोडसे वंचित बहुजन आघाडी चा मार्ग स्वीकारतील असे हि विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे. असे झाले तर नाशिमधून तिरंगी लढत होणार ? परंतु शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा झाल्यानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे.