निवडणुकीच्या धामधुमीत खासदार संजय राऊत रमले अक्षर प्रदर्शनात
सुनील धोपावकर यांच्या अक्षरभेट प्रदर्शनाचा रविवारी शेवटचा दिवस
नाशिक दि,११ मे २०२४ –ज्याला मराठी असल्याचा अभिमान आहे,मराठी भाषेवर ज्याचे प्रेम आहे,जे मराठी वाचतात,मराठीमध्ये विचार करतात त्या प्रत्येकाने हे प्रदर्शन पहिले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नावांची अक्षरभेट या प्रदर्शनास दिलेल्या भेटीदरम्यान केले.
निवडणूक प्रचारासाठी नाशिक दौऱ्यावर आलेले संजय राऊत यांनी अचानक आपला मोर्चा कुसुमाग्रज स्मारकामध्ये संस्कृती नाशिक आयोजित, अक्षररचनाकार सुनील धोपावकर यांच्या प्रदर्शनाकडे वळवला आणि या प्रदर्शनात ते रमून गेले.सुनील धोपावकर यांनी ३५,००० नावे आपल्या अक्षरकलेद्वारे अर्थासह समर्थपणे उलगडून दाखवली आहेत. हे मोठे व अफाट कार्य असून त्याची प्रचिती हे प्रदर्शन पाहतांना वारंवार येते असेही ते म्हणाले.
नाशिक ही कलावंतांची खाण असून या खाणीतील हिरे समाजापुढे आणण्याचे काम संस्कृती नाशिक ही संस्था अविरत करीत असून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यामागची हीच भूमिका असल्याचे संस्कृतीचे अध्यक्ष शाहू खैरे म्हणाले. शाहू खैरे यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संजय राऊत, सुधाकर बडगुजर यांना त्यांच्या नावाची फ्रेम सन्मानपूर्वक देण्यात आली.स्वागत डॉ. कैलास कमोद यांनी तर सूत्रसंचालन पंकज शेवाळे यांनी केले. या कार्यक्रमास आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, सामना नाशिक संपादक बाबा गायकवाड,डॉ,कैलास कमोद, चित्रकार दिनकर जानमाळी,नाशिक कलानिकेतनचे अध्यक्ष रघुनाथ कुलकर्णी, मामा राजवाडे, विजय हांडगे पाटील यासह शेकडो कलाप्रेमी नागरिक उपस्थित होते.
रविवार,१२ मे रोजी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून सकाळी दहा ते दुपारी दोन संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे .वेगळे पाहायची संधी नाशिककरांनी अवश्य साधावी असे आवाहन शाहू खैरे व संस्कृती नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.