मुंबई,दि,१९ मे २०२४ –शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा खुलासा केला आहे.राऊत यांच्या दाव्यानुसार,सध्याच्या सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायचे नव्हते.
कोणत्याही नेत्याला अनुभव नसलेल्या व्यक्तीसोबत काम करायचे नव्हते
पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी सांगितले अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांसारख्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांच्या नावाला विरोध केला होता त्यांच्यासारख्या कनिष्ठ आणि अनुभव नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती करू नका असे ही दावा संजय राऊत यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना पसंत नव्हतीच
संजय राऊत म्हणाले,’काँग्रेस आणि राष्ट्रवादीने म्हटले की त्यांच्याकडे अनेक ज्येष्ठ नेते आहेत. युतीचा नेता अनुभवी,ज्येष्ठ आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा असावा. त्याचवेळी शिवसेनेने महाविकास आघाडीच्या रूपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केले होते. मात्र हस्तांदोलन होण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांनी शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी पसंत नसल्याचे शिवसेनेला सांगितले होते. पण सध्या अजित पवार आणि फडणवीस मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत.
भाजपशी संबंध तोडले होते
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपला मित्रपक्ष भाजपशी संबंध तोडले. ठाकरे यांनी नंतर राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी (तेव्हा अविभाजित) आणि काँग्रेससोबत युती केली. २०२२ मध्ये शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंड केले, ज्यामुळे पक्षात फूट पडली. यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले.