नाशिक,दि,६ जुलै २०२४ – पावसाळा सुरु होऊन दीड महिना लोटला झाला असला तरी नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत नसल्याने परिस्थिती चिंताजनक होत आहे.पावसाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात फक्त दोन टक्के पाणीसाठ्यात वाढ झाल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.पुरेसा पाऊस न झाल्याने नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे.नाशिक जिल्ह्यात एकूण छोटे मोठे २२ धरण आहेत. सध्या या धरणांमध्ये फक्त नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठ्यात १७.५१ टक्क्यांनी घट झाली आहे.
आगामी काळात मुसळधार पाऊस न झाल्यास परिस्थिती चिंताजनक होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे.मात्र नाशिककरांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मागील वर्षी ५ जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा २६.५१ टक्के होता. मागील वर्षाच्या तुलनेत नाशिकचा पाणीसाठा तब्बल १७.५१ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे काही दिवसात नाशिकमध्ये जोरदार पाऊस बरसला नाही तर नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.