मुंबईसह कोकणात पावसाची जोरदार बॅटींग :मुंबईत ७ तासात ३०० मिमी पावसाची नोंद
अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द;शाळांना सुट्टया जाहीर;कोकणात ढगफुटी सदृश पाऊस
मुंबई,दि,८ जुलै २०२४ – मुंबई सह कोकणात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे.हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप,अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.मुंबईत सात तासात ३०० मिमी पावसाची नोंद झाली असून पावसामुळे मुंबईची लोकल सेवा ठप्प झाली असून पुण्यावरून मुंबईला जाणारी सिंहगड ,डेक्कन एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच नाशिकवरून मुंबईला जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही रद्द करण्यात आली आहे.
पावसाचा रस्ते वाहतुक आणि देखील मोठा परिणाम झाला आहे. कुर्ला, अंधेरी, सांताक्रुझमधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. कल्याणपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलसेवेवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नोकरदारवर्गाने घराबाहेर पडण्याआधी या सर्व परिस्थितीचा आढावा घ्यावा, असं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय.
कोकणात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृष्य पाऊस पडत आहे. जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी ओलांडली आहे. यासह रायगड, महाड तालुक्यात देखील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक नद्या नाल्यांना पुर आला आहे यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.महाड तालुक्यातील वाळण विभागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे.संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसाने काळ नदी दुथडी भरून वाहू लागली. सांदोशी, वारंगी, वाळणमध्ये रस्त्यावरून ओढ्यांचे पाणी वाहत आहे. वाळण विभागात अनेक घरांमध्ये पाणी घुसलेआहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडनदिला पूर आला असून गड नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी शेतात घुसले असून गडनदी वर असलेल्या सर्वच पुलांवर पाणी आले आहे. पावसाची जोर असाच सुरू राहिला तर नदीचे पाणी वाड्यांमध्ये घुसण्याची भीती वर्तविली जात आहे. गडनदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.