फक्त लढ म्हणा !

0

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

वयाच्या ११ व्या वर्षी कार अपघातामुळे पाठीचा कणा मोडल्याने आयुष्यभरासाठी आलेले अपंगत्व, त्यानंतर १३ व्या वर्षी नेमबाजीस केलेला प्रारंभ अन् आज वयाच्या १९ व्या वर्षी सुवर्ण पदक !!! पाठीचा कणा मोडला होता पण जिद्द अन् इच्छाशक्तीचा नव्हे !! प्रबळ मानसिकतेने तिने आज भारताकडून Paralympics मध्ये सुवर्ण कामगिरी कामगिरी करणारी पहिली महिला ठरण्याचा बहुमान पटकावला !! तिचं नाव अवनी लेखारा.

नुकत्याच टोकियो येथे झालेल्या ऑलंपिकमध्ये भारताने एकूण ७ पदके जिंकली त्यात १ सुवर्ण, २ रजत आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यानंतर टोकियो इथेच संपन्न झालेल्या Paralympics अर्थात दिव्यांगांच्या ऑलम्पिकमध्ये भारताने एकूण १५ पदांवर आपले नाव कोरले, ज्यात ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता ज्यांना एकेकाळी ‘अपंग’ म्हटलं जायचं आणि आता दिव्यांग म्हणतात, त्यांची उजवी बाजू प्रकाशात आलेली दिसते. ‘दिव्यांग’ म्हणून त्यांना हिणवणाऱ्यांना ही बाजू दाखवायलाच हवी.

मेजर जोशी हे मिलिटरी मध्ये होते. युद्धामधील अपघातात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले, मात्र ‘सैन्यामध्ये मी परत जाऊन देशाची सेवा करणारच’ या जिद्दीने त्यांनी जयपूर फूट वापरून धावण्याच्या, शारीरिक कसरतीच्या सगळ्या परीक्षा पास केल्या आणि आज ते देश सेवेमध्ये मग्न आहेत. “मी कर्नल म्हणून रिटायर होईल” ही त्यांची जिद्द त्यांनी पूर्ण केली आहे.

सर्वपरिचित स्टीफन हॉकिंग मेंदूच्या पक्षाघाताने पीडित असूनही ‘द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं.क्रिश नोलेन यांना जन्मताच मेंदूचा पक्षाघात झालेला होता पण वयाच्या 14 व्या वर्षी त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. कपाळाला स्टिक बांधून ते कंप्यूटर वापरत असत.टॉम गारसाईड या अपंग मुलाने मासेमारी, शिकार, बर्फावरील स्केटिंग या सगळ्या गोष्टींचा आनंद तर घेतलाच सोबत सायन्समध्ये पीएचडी करून सगळ्यांना अचंबितही केलं.

केदार इंदूरकर या बहुविकलांग मुलाने प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचे ‘वाईज आदरवाईज’ हे पुस्तक ब्रेल लिपीत रुपांतरित केले. बुद्धी गुणांक कमी म्हणून फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या 29 वर्षीय केदारला या कामात त्याच्या आई-वडिलांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केलं.

या सगळ्या उदाहरणामधील दिव्यांग व्यक्तींची महत्त्वाकांक्षा, त्यांचा निर्धार, शारीरिक दृष्ट्या निर्दोष, सामान्य मुलांसाठी प्रेरणादायी तर आहेच पण सामान्य मुलांच्या अकार्यक्षमतेला लाज आणणारा आहे. मी काही चुकीचं लिहित आहे असं मला अजिबात वाटत नाही. एखादी बाजू दुबळी असलेल्या व्यक्ती उल्लेखनीय गोष्टी करून दाखवतात मग सर्वार्थाने समृद्ध, निर्दोष, सामान्य मुलं मागे का राहतात ?

आत्ताच्या ऑलिंपिक्सचंच बघितलं तर नॉर्मल खेळाडूंच्या ऑलम्पिक पदकांपेक्षा दुप्पट पदकं पॅरा-ऑलिंपिक्स मध्ये मिळाली. मग या मुलांना दिव्यांग तरी कसं म्हणावं ? त्यांच्यात अशी काय वेगळी गोष्ट आहे जी त्यांना एवढी भरीव कामगिरी करण्यासाठी तयार करते आहे ?

ती गोष्ट आहे जिद्द, सकारात्मकता, प्रत्येक कामात आनंद घेण्याची वृत्ती, मिळालेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानण्याची  कला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांचा सपोर्ट !

यापैकी आपल्या मुलांना आपण किती गोष्टी देतो?

देवाने आपल्या पदरात एक सुदृढ, दिसायला गोंडस, निरोगी बाळ टाकलं आहे याचा आनंद जोपर्यंत आपण आपल्या मुलांची तुलना इतरांशी करायला सुरुवात करत नाही किंवा आपल्या मुलांना ‘रॅट रेसमध्ये’ उतरवत नाही तोवरच आपण घेऊ शकतो. एकदा का आपण तुलना करायला सुरुवात केली की मग आपल्याला दुसऱ्याच्या मुलांची चांगली बाजू दिसते आणि आपण आपल्या मुलांची लंगडीच बाजू सतत बघत राहतो.

ज्यांना देवांनी खरोखरच “स्पेशल चाइल्ड” दिले आहेत, एकदा त्या पालकांकडे बघा. आपल्या मुलांची क्षमता ओळखून, त्यांच्याकडून कुठलीही अवास्तव अपेक्षा न ठेवता, त्यांना पाहिजे तिथे त्यांच्या बरोबर उभे राहण्याची तयारी ठेवून आणि त्यांना जीवनावश्यक कौशल्यांची ओळख करून देण्यासाठी आपला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हे पालक धडपड करतांना दिसतात. माझ्या ओळखीत कितीतरी पालकांनी आपल्या या “खास” मुलांसाठी स्वतःचं करिअरदेखील बाजूला ठेवलेलं आहे आणि त्यांची मुलं खरंच खास कामगीरी बजावत आहेत.

यांच्या मुलांनी साधं एक वाक्य सलग बोललं तरी त्या आई-वडिलांना अतीव आनंद होतो. एखादी छोटीशी गोष्ट त्यांनी व्यवस्थित पार पाडली की या पालकांना आकाश ठेंगणं होतं. कुठलीही अवास्तव अपेक्षा नसल्याने ही मुलं जे काही करतात त्याचा पुरेपूर आणि मनापासून आनंद त्यांचे पालक घेत असतात.

आपण मात्र आपलं मूल जे काही करतोय त्याच्या दोन पावले पुढे जाऊन काही करण्याची अपेक्षा ठेवतो. केलेल्या कामाची पावती मुलाला तर देतच नाही पण त्याचा आनंद स्वतः सुद्धा घेत नाही.

एखादी गोष्ट करण्यामधला आनंद त्या मुलाला मिळण्याआधीच ती गोष्ट अर्धवट टाकून आपण त्याला दुसरी गोष्ट सुरू करण्यासाठी भाग पडतो. उदाहरणार्थ, तुमचा मुलगा झाड लावतो आहे किंवा एखादं चित्र काढतो आहे नेमकं त्याच वेळेला तुम्हाला त्याचा अर्धवट राहिलेला गृहपाठ दिसतो आणि तुम्ही ते काम , ज्याच्या त्याला आनंद मिळतो आहे ते काम सोडून, त्याच्या मागे लागून त्याला अभ्यासाला बसवता. म्हणजे त्याला मिळत असलेला आनंद हरवतो आणि तुमच्या मुलाला आनंदी बघण्याची संधी तुम्ही घालवता.

तुम्हालाही त्यात समाधान मिळत नाही आणि मुलालाही, म्हणूनच आपली मुलं एखादी गोष्ट जिद्दीने करत नाहीत. याउलट आपल्याला कुठलंच काम पूर्ण करता येत नाही याचा न्यूनगंड मुलांच्या मनात तयार होतो.

जिद्द आणि हट्ट यात फरक आहे. आपलं मूल जिद्दी आहे की हट्टी आहे हे आपल्याला ओळखता यायला हवं. मूल जर हट्टी असेल तर त्याला प्रेमाने समजवायला हवं आणि मुलांनी जर जिद्दीने एखादी गोष्ट करायची ठरवली असेल तर त्याला प्रेमाने समजूनही घेता यायला हवं.

कित्तेकदा मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट करता येत नसेल तर त्यांच्या वर्तवणुकीत बदल झालेला दिसून येतो. हा बदल लक्षात येताच पालकांनी संवाद साधून मुलांची मानसिकता समजून घेतली तर मुलांनाही निर्णय घेण्यासाठी योग्य वातावरण मिळेल.

शिक्षण क्षेत्रात काम करत असल्याने मलाही अनेक प्रकारचे पालक भेटतात. अनेक प्रकारच्या समस्या कानावर पडतात. मी स्वतः अनेक शाळांना, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन भेट देते. तिथे होणाऱ्या चांगल्या गोष्टींची दखल घेते आणि त्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात कुठे वापरता येतील याविषयी माझा सतत विचार चालू असतो. मध्यंतरी एकदा काही शाळांना भेटी देत असताना दिल्लीमधील एका शाळेविषयी मी ऐकलं. ती शाळा गतिमंद व इतर दिव्यांग मुलांसाठीच शिक्षण देते. शाळेचं नाव होतं “दिशा”! वरवर पाहता हे नाव तिथे दिव्यांगांना दिशा दाखवली जाते या कारणाने समर्पकच वाटलं. इथे पाय ठेवतानाच एक आर्ट गॅलरी होती. त्या शाळेतील गतिमंद व दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. त्यात काय नव्हतं? वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या, चित्र, शिल्प, ज्वेलरी, पेपर प्लेट, मसाले, बिस्किट्स, साबण इतकंच नाही तर घाण्यावर काढलेलं तेलही विक्रीसाठी उपलब्ध होतं. एक नजर टाकली तर या वस्तू, ही चित्र कुठल्या दिव्यांग आणि गतिमंद मुलांनी तयार केले आहेत हे सांगूनही पटलं नसतं.

त्या शाळेतून फेरफटका मारत असताना मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे इथे मिळणारं वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण आणि आपल्या शाळांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाची तफावत! “दिशा” सारख्या संस्थेत शिक्षण देणारी दिव्यांग मुलं जेव्हा ७-८, जास्तीत जास्त १० वर्षांनी बाहेरच्या समाजात मिसळायला सुरूवात करतात त्यावेळी ही मुलं आत्मनिर्भर होऊन पोटापाण्याचा व्यवसाय करताना दिसतात. स्वतःचा चरितार्थ चालवण्या इतपत जीवनावश्यक कौशल्य त्यांना त्यांच्या शिक्षणानी दिलेली असतात. आपल्या कडे मात्र आपली तिसऱ्या वर्षी नर्सरीत गेलेली मुलं वयाच्या एकविसाव्या वर्षी पदवी घेऊन बाहेर पडतात आणि नोकरी शोधण्याच्या मागे लागतात. आपल्या शिक्षणाने आपल्या आयुष्याची थोडीथोडकी नाही तर तब्बल १७-१८ वर्षे घेतली आणि त्या बदल्यात आपल्याला चरितार्थ चालविण्याचे कौशल्य तर सोडाच पण ‘व्यवसायिक म्हणून आपण उभा राहू शकतो’ हा साधा विचारही दिलेला नाही.

‘दिशामध्ये’ दाखल झालेली मुलं एका वयाची आहेत म्हणून पहिलीत, पहिली पास झाली म्हणून दुसरीत, अशाप्रकारे पुढे जात नव्हती तर ज्याला जे काम करायला आवडेल ते काम शिकवणाऱ्या वर्गामध्ये ती मुलं जात होती. तिथे वयाचा संबंध नव्हता. संमिश्र वयोगटातील मुलं त्या वर्गात त्यांच्या आवडीचं स्किल आत्मसात करत होते. शाळेमध्ये घंटा वाजली की तास बदलत नव्हता, त्याऐवजी तासन तास एकाच गोष्टीवर मन लावून मुलं काम करत होती. ज्यातून वस्तू निर्मिती तर होतच होती पण मुलांना आनंद आणि समाधान सुद्धा मिळत होतं. याउलट आपल्या शाळांमध्ये एखाद्या विषयात रुची उत्पन्न व्हायला लागली कि मुलं कान देऊन ऐकायला सुरुवात करतात, तोवर तास संपतो आणि दुसरा विषय शिकवायला सुरुवात होते. मुलांचं ना धड गणित शिकून होतं ना इतिहास, आणि मग मुलांच्या डोक्यात अभ्यासाचं युद्ध सुरू होतं आणि यातून आयुष्याच समीकरण चुकतं.

ही सगळी परिस्थिती बघता खरोखरच एक गहन विचार मनात येतो, तो म्हणजे ‘दिशा’ सारख्या संस्थेतून दिल जाणारं शिक्षण दिव्यांग मुलांना स्वावलंबी बनवत आहे. मात्र सो कॉल्ड नामांकित शैक्षणिक संस्था आपल्या हातीपायी धड असणाऱ्या मुलांना परावलंबी बनवत आहेत. यातून मार्ग काढायचा असेल तर पालकांनो वेळीच सावध व्हा !

 शिक्षणाच्या बरोबरीने आपल्या मुलांना एखादी कला, एखादं शास्त्र, एखादं कौशल्य शिकण्याची संधी उपलब्ध करून द्या पण हे करताना त्यांची आवड लक्षात घ्या. शाळा, पदवी, अभ्यास हे आपल्या मुलांसाठी अनिवार्य असलं तरीही पदवी मिळाल्यानंतर मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर त्यांच्यातली सृजनशीलता वाढवा.

एकाच गोष्टीकडे विविध दृष्टिकोनातून बघण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा.आपल्याला रोज जीवन जगतांना ज्या गोष्टी अडत आहेत त्या अधिक सोप्या करण्यासाठी काही नवीन विचार आपली मुलं करू शकतील का यासाठी त्यांना प्रेरित करा. या सगळ्या परिस्थितीतूनच नवीन नवीन शोध लागतील. नव्या वाटेने विचार केल्यामुळे मुलांनाही एक प्रकारचा उत्साह येईल. सरधोपट पद्धतीने तीच तीच गोष्ट करण्याचा कंटाळा पळून जाईल. छोट्या छोट्या गोष्टी करण्यातला आनंद मुलांना मिळायला लागेल. त्यांच्यातील कल्पकता तुमच्यापर्यंत संवादाच्या माध्यमातून पोहोचवण्याची संधी त्यांना द्या.

आपल्या आज्या-पणज्यांनी शोधून ठेवलेल्या मार्गांवरून डोळे झाकून आपण चालत राहिलो पण आता अलीकडच्या काळात हे सगळे जुने मार्ग आपल्याला ध्येयापर्यंत पोहचवू शकत नाही हे आपल्या लक्षात आले आहे म्हणूनच आपल्या मुलांसाठी या नवीन जगामध्ये तयार होणाऱ्या नवीन मार्गांवर चालण्याची क्षमता यायला हवी.

ही क्षमता दुर्दैवाने शाळेत मिळणाऱ्या शिक्षणातून येणार नाही. शाळेत मिळणाऱ शिक्षण हे आपल्या मुलांना केवळ ‘साक्षर’ बनवेल पण त्यांना “सक्षम” बनवण्याची जबाबदारी पालक म्हणून कायम आपलीच होती, आपलीच आहे आणि आपलीच राहणार आहे. मुलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना सुसंस्कारित, विचारांनी संपन्न, शरीराने सुदृढ बनवण हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

अलीकडच्या काळात आपण “शिक्षण आणि त्या शिक्षणासाठी आपण भरत असलेली शाळेची फी” यापलीकडे जाऊन फारसा विचार करत नाही. कारण शाळेच्या फीचे लाखो रुपये आपण भरले म्हणजे ती शाळा आपल्या मुलाला “लाखमोलाचे शिक्षण” देईल ही आपली भाबडी समजूत झालेली आहे. पण ‘लाखाला लाख’ हा व्यवहार शिक्षणात कामी येत नाही कारण शिक्षण हे कुणी देण्याची गोष्ट नाहीच मुळी! शिक्षण ही प्रत्येकाने घेण्याची गोष्ट आहे. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार ती घेत असतो. ‘सब घोडे बारा टक्के’ हा न्याय शिक्षणाच्या बाबतीत लागू होत नाही. आपल्या मुलांनी आपण भरलेल्या लाखो रुपयांचं शिक्षण व्यवस्थित घ्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी नुसतंच मुलाला शाळेच्या वर्गात नेऊन बसवणं आणि शाळा सुटली की घरी आणणं याच्या कितीतरी पलीकडे जाऊन तुम्हाला आटोकाट प्रयत्न करावे लागणार आहेत.

मेंढराच्या कळपात सामील झालेल्या तुमच्या मुलाला कळपातून बाहेर येऊन जगणं, नुसतं जगणंच नाही तर आनंदाने जगणं तुम्हाला शिकवावे लागेल. नाहीतर जसं पुंगीवाल्याच्या मागे सगळे उंदीर गावाबाहेर गेले तशीच आपली मुलं खुळावून, नादावून चुकीच्या व्यक्तीमागे, चुकीच्या प्रवृत्ती मागे जाऊ शकतील याचा विचार करा.

अपंगत्व हे शारीरिक असेल तर लगेच दिसून येतं त्यावर विविध उपचार करून त्यावर मात करता येते पण मानसिक अपंगत्व कित्येकदा लक्षातच येत नाही आणि म्हणून त्यावर उपायसुद्धा केले जात नाहीत.

आपल्या मुलांमध्ये आजूबाजूच्या वातावरणामुळे अनेक प्रकारच्या समस्या मानसिक स्तरावर उत्पन्न होत आहेत. ‘फोमो’ अर्थात फियर ऑफ मिसिंग आऊट, ‘फोबो’ अर्थात फियर ऑफ बेटर ऑप्शन आणि ‘फोडा’ अर्थात ऑफ डुइंग ॲक्शन या अगदी अलीकडच्या संज्ञा आहेत. यावर मी माझ्या पुढच्या लेखात नक्कीच बोलणार आहे. आपल्या मुलांवर असलेले मानसिक ताण वेळीण ओळखून त्यातून मुलांना मोकळं करायला हवं. त्यांच्या भावनांना, त्यांच्या विचारांना योग्य पद्धतीने हाताळायला हवं.

एकविसाव्या शतकातील पालक म्हणून मिरवतांनाच आपल्या नशिबी एक मोठी जबाबदारी आलेली आहे हे मान्य करून, आपल्या मागच्या पिढीचा अनुभव आपल्याला फारसा उपयोगी पडणार नाही हे समजून, नवीन अनुभवांना सामोरे जाण्याची आणि त्यातून योग्य मार्ग काढत आनंदी जीवन जगण्याची कला आपल्यालाही आत्मसात करायलाच हवी तरच आपण ‘आनंदी मुलांचे पालक’ म्हणण्याला लायक ठरणार आहोत ! आपल्या मुलांनी काही मागण्याआधीच आपण त्यांना खूप काही देत असतो.

कदाचित म्हणूनच मुलांना त्या गोष्टींची किंमतही वाटेनाशी होते. याउलट जिथे परिस्थितीमुळे काही गोष्टींचा अभाव असतो, ती मुलं जिद्दीने खूप काही मिळवतात. मला वाटतं आपण भौतिक सुखसोयी मुलांना देत असतांनाच, त्यांच्या जगण्याच्या लढाईसाठी त्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार करायला हवं. मुलांनी अगदी मनापासून आपल्याला म्हणायला हवं की, “बाकी काही नको, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!” तोच आपल्यासाठी ‘सोनियाचा दिनू’ असेल नाही का ?

तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.

eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524

https://www.instagram.com/theblooming.minds/

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.