नवी दिल्ली,दि,२१ सप्टेंबर २०२४ –महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुद्दा निवडणूक चिन्हाचाच असून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हे त्यांच्या वतीने आव्हान सादर करत आहेत. शुक्रवारी सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या पत्राचा उल्लेख केला ज्यामध्ये त्यांच्या मागण्यांचा उल्लेख आहे. किंबहुना निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह घड्याळ वाटप गोठवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी चिन्हाबाबत निर्णय होणं महत्त्वाचे आहे, अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली.जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे फ्रिज करण्यात यावं,असे शरद पवार म्हणाले.घड्याळ या चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको,अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली आहे.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुईयांसमोर आले आहे. दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर राष्ट्रवादी पक्षाच्या ‘नाव’ आणि ‘चिन्ह’ प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सिंधवी यांच्या या अर्जावर बुधवार २५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. बुधवारी यादी जाहीर होईल, त्यानंतरच केसचा नंबर कळू शकेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख १२नोव्हेंबर आहे. काल ज्याचा उल्लेख केला होता तो मुख्य प्रकरणात अंतरिम अर्ज होता.
अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता या प्रकरणाची तात्काळ यादी हवी आहे. या प्रकरणावर अंतिम निर्णय होईपर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्हे देण्यात यावीत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या ६ फेब्रुवारीच्या आदेशाविरोधात शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादीचे ‘घड्याळ ‘ हे निवडणूक चिन्हही दिले आहे.
शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह फाळणीपूर्वी घड्याळ होते. १९ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांच्या गटाला देशातील लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस ‘हे निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्याची परवानगी दिली होती. १९ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे पक्षाचे नाव देण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश पुढील आदेशापर्यंत कायम राहील,असे निर्देश दिले होते.