कवी प्रकाश होळकर यांची साहित्य, संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड

0

नाशिक,१६ ऑक्टोबर २०२४ – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे,उपाध्यक्षपदी प्रदीप ढवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्यांमध्ये ग्रामीण जीवनाचे,निसर्गाचे चित्रण करणारे लासलगावचे संवेदनशील कवी प्रकाश होळकर यांचा समावेश आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह २४ साहित्यिकांचा मंडळाच्या कार्यकारीणीवर समावेश करण्यात आला आहे.एकूण ३ वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत ही नियुक्ती करण्यात आली आहे.

कवी प्रकाश होळकर यांचा शेती व ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब रेखाटणारा कोरडे नक्षत्र (पॉप्युलर प्रकाशन) हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे.कवी ना. धों. महानोर यांच्या निवडक पत्र संग्रह असलेला रानगंधाचे गारुड (पॉप्युलर प्रकाशन) या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले आहे. मृगाच्या कविता (पॉप्युलर प्रकाशन) हा त्यांचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे. होळकर यांना यशवंतराव चव्हाण साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ‘यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’ (१९९८), मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी दिला जाणारा ‘घनःश्यामदास सराफ साहित्य सन्मान पुरस्कार’ (१९९८), कुसुमाग्रजांच्या गौरवार्थ दिला जाणारा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ‘विशाखा काव्यपुरस्कार’ (१९९८), महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा ‘महाराष्ट्रकवी यशवंत काव्य पुरस्कार’ (१९९७-९८), प्रवरा उद्योग समूहातर्फे दिला जाणारा ‘प‌द्मश्री विखेपाटील प्रेरणा पुरस्कार’ (१९९४), बहिणाबाई प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘कविवर्य ना. धों. महानोर काव्यपुरस्कार’ (१९९८), आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचा ‘आचार्य प्र. के. अत्रे साहित्य पुरस्कार’ (२०१२) यासह अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे नाशिक जिल्ह्यातील साहित्यिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.