नाशिक,दि,६ डिसेंबर २०२४ –भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रेन स्ट्रोक आल्याने पिचड यांच्यावर दोन महिन्यांपासून नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू होते.
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना १५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकच्या ९ पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मधुकर पिचड यांच्या जाण्याने चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
मधुकर पिचड यांनी अनेक महत्त्वाची राजकीय पदं सांभाळली आहेत. आदिवासी समाजातील कार्यकर्ते आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज्य सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही अनेक वर्षे काम केलं आहे. मधुकर पिचड यांनी १९८० ते २००९ पर्यंत नगर जिल्ह्यातील (आताचा अहिल्यानगर) अकोले विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. तर मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास : सुरुवातीच्या काळात शरद पवार यांचे खंदे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांची खरी राजकीय ओळख. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. परंतु 2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मधुकर पिचड यांनी सहकार क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. अमृतसागर दूध सहकारी संस्था अकोले त्यांनी स्थापना केली. तसंच अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना करुन संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. सुरुवातीला सत्तरच्या दशकात जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि नंतर पंचायत समिती अकोले तालुका अध्यक्ष म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.
१ जून १९४१ रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे एक शिक्षक होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बी ए एल एल बी करुन वकिलीची शिक्षण पूर्ण केलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
मधुकर पिचड यांच्यावर उद्या (शनिवार दि. ७ डिसेंबर ) रोजी दुपारी ४ वाजता राजूर ता.अकोले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.