‘संवाद’च्या अध्यक्षपदी स्वानंद बेदरकर यांची निवड
नाशिक,दि,१० डिसेंबर २०२४ -नाशिकच्या साहित्यिक-सांस्कृतिक वातावरणाला ऊर्जा देण्याचे काम सतत चाळीस वर्ष करणाऱ्या ‘संवाद’ या संस्थेच्या अध्यक्षपदी तरुण साहित्यिक आणि अमृतवक्ता स्वानंद बेदरकर यांची निवड झाली आहे.
‘संवाद’ या संस्थेची २०२३-२४ सालची वार्षिक सर्वसाधारण सभा डिसुझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्र मंडळाच्या सभागृहात मावळते अध्यक्ष, साहित्यिक अभिमन्यू सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, दिवंगतांना श्रद्धांजली, यशस्वितांचे अभिनंदन, मार्च २०२४ अखेर आर्थिक वर्षाचा अहवाल, लेखापरीक्षण अहवाल, हिशेब पत्रिका, लेखापरीक्षकांची नियुक्ती, २०२३-२४ चे अंदाजपत्रक या प्रस्तावित विषयानंतर २०२४-२७ या वर्षासाठीच्या कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी विषय पुढे आला आणि त्यात सर्वानुमते स्वानंद बेदरकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष म्हणून प्राचार्य बापूराव देसाई यांची निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळ नियुक्तीचे सर्वाधिकार अध्यक्ष म्हणून बेदरकर यांना देण्यात आले असून लवकरच कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात येईल असे बेदरकर यांनी सांगितले.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, डॉ. अ. वा. वर्टी, डॉ. चंद्रकांत वर्तक, ज्येष्ठ कादंबरीकार मनोहर शहाणे, शिक्षणतज्ञ भावना भार्गवे या आणि यांच्यासारख्या नाशिकमधील साहित्यिकांनी ‘संवाद’ ही संस्था सुरू केली. कालांतराने ज्येष्ठ संपादक दत्ता सराफ यांनी ‘संवाद’ला संस्थात्मक रूप दिले. त्यानंतर चंद्रकांत महामिने, किशोर पाठक यांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. ‘संवाद’च्या वर्धापनदिनी महाराष्ट्रातील जवळपास सर्व नामवंत साहित्यिक अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. अशा संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा नव्या काळात नाशिकचे नाव महाराष्ट्राच्या साहित्यिक वर्तुळात नेणारे, वक्ता म्हणून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रबाहेरही ख्याती असलेले स्वानंद बेदरकर यांना मिळाल्यामुळे साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त झाला आहे.
एका जुन्या जाणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड होणे ही एक मोठी जबाबदारी आहे. ती अत्यंत नम्रपणे मी स्वीकारतो. संस्थेचे नाव महाराष्ट्रात उज्ज्वल करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन सर्वतोपरी काम करण्याचा प्रयत्न करीन.
स्वानंद बेदरकर
अभिनंदन.