बीड,दि,१२ फेब्रुवारी २०२५ –वाल्मिक कराडनंतर दुसरा चर्चेत आलेला गुन्हेगार अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला अटक करण्यात आली आहे.सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर बीड जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसले याने अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले याचे पैशांचे बंडल फेकणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.खोक्या भोसले हा आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून खोक्या भोसलेला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. सतीश भोसले आज स्वतः पोलिसांना शरण जाणार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस यांच्या माध्यमातून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रयाग राजहून सतीश भोसले याला बीडकडे आणले जात आहे.खोक्या चार दिवसांपासून फरार आहे. सतीश भोसले हा पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुरु होती. पण त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सतीश भोसले ऊर्फ खोक्या याच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार होता.
त्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात हत्यारे, शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर साहित्य मिळाले होते. सतीश भोसले हा राजकारणात सक्रिय आहे. त्याच्याकडे भाजपचे महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पदही होते. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याने त्याचा परिसरात दबदबा आहे.
पोलीस आणि वनविभागाने घेतलेल्या झाडाझडतीत खोक्याच्या घरामध्ये पोलिसांना वाळलेलं जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य आढळून आलं. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं.