फरार कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा ?

0

नाशिक,दि,१२ मार्च २०२५ –बीड येथील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा स्थानिकांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय. कृष्णा आंधळेने तोंडाला मास्क आणि कपाळाला टिळा लावला होता, असे वर्णन सुद्धा स्थानिकांनी केले आहे. यामुळे सध्या एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. आता या तपासणीत नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बीड  येथील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला  तीन महिने उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे  हा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अजूनही फरार आहे. आता फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शी वकील गीतेश बनकर यांनी म्हटले आहे की, सहदेवनगर येथे मी वास्तव्यास आहे. सकाळी मी घरातून निघालो आणि दत्त मंदिरापाशी आलो, तेव्हा एका झाडाच्या इथे दोन जण मला दिसले. ते त्यावेळी मास्क घालत होते. यानंतर कृष्णा आंधळे याने जेव्हा त्याचा मास्क खाली घेतला. तेव्हा मी त्याला ओळखले आणि तात्काळ गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला. मी बघितलेली व्यक्ती कृष्णा आंधळेच होती. तो आता मखमलाबाद च्या दिशेने गेला आहे. दोन जण मोटरसायकलवर होते, असे त्यांनी म्हटले आहे.
तर नागरिकांनी हटकल्यानंतर मोटारसायकल वरून तो पळून गेल्याचा दावा देखील स्थानिकांनी केला आहे.  सीसीटीव्ही फूटेजची पोलिसांकडून तपासणीदरम्यान मागील महिन्यात देखील कृष्णा आंधळे हा नाशिकरोड परिसरात एका मंदिरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले होते.
आता गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगर परिसरात कृष्णा आंधळे असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाची खातरजमा करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. आता या तपासणीत नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!