मुंबई,दि,१,एप्रिल २०२५ – Maharashtra Weather Update महाराष्ट्रातील अनेक भागात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे. उत्तर भारतात सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढण्यास सुरुवाच झाली असून, त्यामुळं पुढील २४ तासांसह चालू आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागांसह मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रमध्ये अवकाळीची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. दक्षिण कोकणात एप्रिलमध्ये उन्हाळी पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे आंबा पिकाच्या मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.जळगाव जिल्ह्यात देखील हलक्या स्वरूपाचा अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने, शेतकरी तसेच चाकर मान्यानची मोठी धावपळ उडाल्याचं पाहायला मिळाले आहे. या पावसाने एन काढणी सुरू असलेल्या ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान मराठवाड्यात चक्री वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल होत असून, त्यामुळं वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. IMDच्या अंदाजानुसार आजपासून काही दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
अकोल्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. मुर्तीजापुर तालुक्यातल्या निपाणा गावात देखील अवकाळी पाऊस झाला आहे. काल (३१ मार्च) रात्री आठ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि जवळपास १५ ते २० मिनिट पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.