मुंबई,दि,८ एप्रिल २०२५ –अवकाळी पावसानंतर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करत हवामान विभागाने नागरिकांना सतर्क केलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही चित्र वेगळं नसून इथं दमट हवामानात वाढ झाल्यानं ३५ अंशांवरील तापमानाचा दाहसुद्धा ४० अंशांइतका भासत आहे. दुपारच्या वेळी उकाडा आणखी तीव्र होत असल्यामुळं नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच संपूर्ण देशभरात तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळं नागरिकांना आज पासून अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. देश स्तरावर पश्चिम राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छमधील काही अंतर्गत भागांमध्ये उष्णतेची तीव्रता आणखी वाढली आहे. तर, राजस्थानच्या सीमाभागात तापमान ४५ अंशांच्याही पलिकडे पोहोचलं आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये तापमान ४५ अंश नोंदवले गेले आहे हे तापमान देशातील सर्वाधिक तापमान असल्याचं सांगण्यात आलं.
महाराष्ट्रातही चित्र वेगळं नव्हतं. राज्यात सूर्य आग ओकतोय. अकोल्याचा पारा सर्वाधिक असल्याचं सांगण्यात आलं असून, इथं पारा ४४ अंशांवर पोहोचल्याची नोंद करण्यात आली. तर, चंद्रपूरात तापमान ४३.६ अंशांवर पोहोचलं. हिंगोली आणि परभणीचं तापमानही ४१ अंशांवर गेल्यामुळं राज्याच्या विदर्भ भागामध्ये उन्हामुळं चांगलीच होरपळ होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसात नागपुरात तापमान ४५ अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, पश्चिम विदर्भातील अकोला आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात तापमान वाढीचा प्रभाव जाणवेल अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.
आर.बालासुब्रह्मण्यन- संचालक (शास्त्रज्ञ) प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्या माहितीनुसार सध्या बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने 12 एप्रिल पासून तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण-पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या माहितीनुसार उष्णतेच्या लाटेचं सर्वात मोठं कारण म्हणजे पाकिस्तानच्या दक्षिण आणि मध्य भागांमध्ये सुरू असणारा प्रचंड उकाडा. सध्याच्या घडीला सिंध प्रांतातील हैदराबादमध्ये तापमान ४५ अंश, नवाबशाहमध्ये तापमान ४७ अंश, पाड ईदान इथं ४६ अंश, सिबी शहरात तापमान ४६ अशांवर पोहोचलं आहे. या आणि अशा भागांमधून उष्ण वारे गुजरात आणि राजस्थानच्या दिशेनं येत असून या भागांमध्ये सातत्यानं तापमानवाढ नोंदवली जात आहे. परिणामी पुढील काही दिवस गुजरात आणि नजीकच्या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसम वातावरण पाहायला मिळेल असा इशारा हवामान विभागानं जाहीर केले आहे.