शिवपुत्र संभाजी महानाट्यातुन छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास उलगडणार
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन
नाशिक,दि,१७ एप्रिल २०२५ –ज्ञानवर्धिनी प्रसारक मंडळ व तळ्याची वाडी कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने जगदंब क्रिएशन प्रस्तुत शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन दिनांक ३० एप्रिल ते पाच मे दरम्यान नाशिक मध्ये तपोवन साधू ग्राम मैदानावर गोपाळ पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिका साकारणारे खासदार अमोल कोल्हे,डॉ.घनश्याम राव यांनी आज मुंबई ते जळगाव दौऱ्या दरम्यान नाशिक येथे भेट दिली असता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सभागृहात नाशिक शहरातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शिवपुत्र संभाजी महानाट्य यशस्वी करण्याचे आवाहन केले.
शिवपुत्र संभाजी महानाट्य हे ऐतिहासिक विचारांचे प्रगल्भ भांडार असून लहान थोरांपासून सर्वांनीच हे महानाट्य आवर्जून पहावे व छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनावर आधारीत असलेला धगधगता इतिहास तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन उपस्थित सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कोल्हे यांनी केले. प्रारंभी शिवपुत्र संभाजी महाराज यांचे नाशिकमध्ये सन 2023 मध्ये पार पाडलेल्या महानाट्याच्या अनुभवाचे कथन समन्वयक योगेश कमोद यांनी केले. मागील वेळी सहा दिवस हे महानाट्य आयोजित केले असता नाशिककरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे दोन दिवस डिमांड शो होऊन एकूण आठ दिवस हे महानाट्य यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या संस्थांनी परिश्रम घेतले त्यांचे आभार देखील कमोद यांनी मांडले. यावेळी होणाऱ्या महानाट्यासाठी विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत केलेल्या सहकार्यामुळे पन्नास टक्के पेक्षा अधिक तिकीट विक्री झाली असून हे महानाट्य यशस्वी करण्यासाठी सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना मांडून त्या सूचना अमलात आणण्यासाठी आयोजक गोपाळ पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हे महानाट्य यशस्वी करणे क्रमप्राप्त असल्याचे सूचक उद्गार यावेळी काढले.
यावेळी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, व्हि एन नाईक शिक्षण संस्थेचे सचिव हेमंत धात्रक, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजेंद्र निकम, ग्लोबल एज्युकेशन संस्थेच्या संस्थापिका विजयालक्ष्मी मणेरीकर, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे शिक्षणाधिकारी जयंत ढोके, मानवधन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कोल्हे, हौसिंग फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्राचे संचालक, मेडीकल असोसिएशिनच्य खजिनदार बोरसे, डॉ महाले, अखिल भारतीय मराठी नाटयसंस्थेचे कार्यवाह सुनिल ढगे, saturday संडे सायकलिस्ट क्लब च्या तृप्तीदा काटकर बी एन आयचे अध्यक्ष सतिश पिसाळ, फ्रेडस सर्कलचे जयप्रकाश जातेगावकर, योगेश आडभाई, अपुर्व पाटील आदींसह राजेश भुसारे , गिरीश गर्गे, विनायक शिंदे आदी उपस्थीत होते. यावेळी शिवपुत्र संभाजी महानाटयाच्या माहिती पुस्तकाचे अनावरण खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तर आभार प्रदर्शन नचिकेत पाटील यांनी केले.