बहुप्रतिक्षित ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’हे रोमँटिक गीत प्रदर्शित

0

मुंबई,दि,२१ एप्रिल २०२५ – लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले असून त्यांच्या या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा सुरू असतानाच, या चित्रपटातील नवीन रोमँटिक गीत ‘सोबती’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मैत्रीला अर्पण केलेले हे हृदयस्पर्शी गीत आहे. ‘सोबती’ हे या चित्रपटातील तिसरे गाणे असून, याआधी ‘पांडुरंग’ या भावस्पर्शी गाण्याने आणि  ‘आलेच मी’ झगमगत्या लावणीने रसिकांची मने जिंकली आहेत.

‘सोबती’ हे गाणे महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांचा भावनिक प्रवास आणि त्यांच्यातील नात्याची गोडी सुंदरपणे टिपणारे गाणे असून या गाण्याला शेखर रावजीआनी आणि आर्या आंबेकर यांनी आत्मीयतेने गायले आहे. या गाण्याला रोहन-रोहन या जोडीचे संगीत लाभले असून, गीतकार प्रशांत मडपुवार यांच्या शब्दांना रोहन प्रधान यांनी काही अतिरिक्त ओळी दिल्या आहेत.

आपला अनुभव सांगताना शेखर रावजीयानी म्हणतात, “जेव्हा रोहन-रोहन यांनी मला ‘सोबती’साठी संपर्क केला, तेव्हा या गीतातील साधेपणा आणि भावनिकता मला लगेच भावली. हे गाणे साकारताना अतिशय छान अनुभव आला, आणि आम्हाला आशा आहे की प्रेक्षकही याच्या गाभ्याशी जोडले जातील.”

आर्या आंबेकर म्हणते, “शेखर सरांसोबत गायला मिळणं आणि रोहन-रोहन यांच्यासोबत काम करणं हे स्वप्नवत होतं. ‘सोबती’ हे अतिशय प्रेमळ आणि मनापासून गायलेलं गीत आहे. आम्ही यात जेवढं प्रेम ओतलं आहे, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे, हीच इच्छा आहे.”

लव फिल्म्स प्रस्तुत तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटाचे लव रंजन व अंकुर गर्ग निर्माते आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!