ठाकरे बंधूंचा ऐतिहासिक मेळावा:आम्ही एकत्र आलो आहोत,एकत्र राहण्यासाठी-उद्धव ठाकरे

आम्हाला एकत्रं आणणं बाळासाहेबांना जमलं नाही पण ते देवेंद्र फडणवीसांना जमलं;राज ठाकरेंचा थेट वार

0

मुंबई, ५ जुलै २०२५: Raj,Uddhav Thackeray rally महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण घडला. तब्बल १९ वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र आले. मुंबईच्या वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित ‘विजयी मेळाव्या’मध्ये ठाकरे बंधूंच्या गळाभेटीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी दिलेल्या भाषणांतून शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

उद्धव ठाकरे यांचा भावनिक आणि आक्रमक सूर(Raj,Uddhav Thackeray rally)
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भावनिक आणि तीव्र राजकीय टीका यांचा सुरेख समतोल साधला. “आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी” असे ठणकावून सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले, “आम्हाला एकत्र आणणे बाळासाहेबांना जमले नाही, पण देवेंद्र फडणवीसांना जमले.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “राज यांनी मला सन्मानीय म्हटले. मीही त्यांना सन्मानीय म्हणतो. आजच्या भाषणांपेक्षा आम्ही दोघे एकत्र दिसतोय, हेच महत्वाचे आहे. आमच्यातील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची गरज नाही.”

हिंदुत्व आणि मराठी अस्मिता
भाजपकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत. हिंदुत्व आम्ही सोडले नाही. आज मराठी माणूस न्याय मागतोय, त्याला गुंड म्हणायचं का? मग हो आम्ही गुंड आहोत!”

ते पुढे म्हणाले, “2014 नंतर उद्योगधंदे गुजरातला गेले. हे सरकार दोन व्यापाऱ्यांसाठी चालवलं जातं. आमचं सरकार पाडलं गेलं. महाराष्ट्रासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत.”

भाजपवर घणाघाती टीका
उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस म्हणतात भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही. पण मराठी माणूस इतर राज्यांत भाषिक दादागिरी करत नाही. तुमचे मालक गुजरातमध्ये आहेत. जय गुजरात म्हणणाऱ्यांना लाज वाटायला हवी.”त्यांनी पुष्पा चित्रपटातील संवाद उद्धृत करत टीका केली, “पुष्पा म्हणतो झुकेगा नहीं साला, पण हा म्हणतो उठेगा नहीं साला! उघडा डोळे, बघा नीट.”

राज ठाकरे यांचे भाषण : मराठी हाच अजेंडा
राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच दमदार केली. “कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा!” असे सांगत त्यांनी भाषिक अस्मितेचा मुद्दा अधोरेखित केला.
“तुमच्याकडे विधानभवनात सत्ता आहे, आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे,” असे म्हणत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “मराठी माणूस एका भाषेने बांधला जाऊ शकतो. हिंदी ही फक्त २०० वर्षांपूर्वीची आहे. मराठी ही शेकडो वर्षांची आहे.”
ते पुढे म्हणाले, “बाळासाहेबांना आम्हाला एकत्र आणता आले नाही, पण फडणवीसांना जमले. आज आम्ही एकत्र आलो आहोत कारण महाराष्ट्र मोठा आहे.”

आदित्य आणि अमितची एकजूट : पुढच्या पिढीचा संदेश
या मेळाव्याचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची एकत्रित उपस्थिती. सुप्रिया सुळे यांनी दोघांना स्टेजवर बोलावले आणि त्यांनी हातात हात घातला. उद्धव ठाकरेंनी अमितला जवळ घेतले.
यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही स्टेजवर उपस्थित होत्या. हे दृश्‍य एका मोठ्या एकतेचे प्रतिक ठरले.

भाजपकडून टीकेची झोड
ठाकरे बंधूंच्या या एकतेनंतर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया आली. भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले, “उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलॉजी भिनली आहे. आजचा मेळावा म्हणजे राजकीय पेरणीचा प्रयत्न आहे.”दरेकर पुढे म्हणाले, “मराठीला अभिजात दर्जा फडणवीस साहेबांच्या प्रयत्नाने मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या काळात मराठीसाठी काय झालं?”
मंत्री आशिष शेलार यांनीही टीका करत म्हटले, “महापालिका निवडणुका आल्या म्हणून भाऊबंदकी आठवली. ही ‘कौटुंबिक तहासाठी’ केलेली केविलवाणी धडपड आहे.”

एकजूट की निवडणुकीचा खेळ?
या मेळाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हलचल झाली आहे. ही एकजूट निवडणुकीसाठीचा आघाडीचा भाग आहे की मराठी अस्मितेच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट निश्चित – ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण वळण आहे.

https://www.facebook.com/share/v/1AuoD7kwYV/

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!