एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची जादुई सफर

'प्रेमाची गोष्ट २' चा हटके टीझर प्रदर्शित!

1

मुंबई, दि. १६ जुलै २०२५ – Marathi Movie Teaser मराठी सिनेसृष्टीतील एक दिलखुलास प्रेमकथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज झाली आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा हटके टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, टीझरने काही क्षणांतच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेचे वादळ निर्माण केले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट येत्या २२ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. घटस्फोटासारख्या संवेदनशील विषयाला भिडत, प्रेम आणि नात्यांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने अनेकांचे मन जिंकले. त्यामुळेच आता ‘प्रेमाची गोष्ट २’ बाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.

या टीझरमध्ये (Marathi Movie Teaser)ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसतो आहे. तो घटस्फोटासाठी कोर्टात आलेला असतो आणि त्याच्याच शब्दांत देवालाच प्रेमातल्या अपयशासाठी दोष देतो. विशेष म्हणजे, टीझरमध्ये प्रत्यक्ष देवाचे पात्र साकारले असून तो ललितला आपल्या नशिबातलं प्रेम बदलण्याची दुसरी संधी देतो. त्यानंतर सुरु होतो एक मजेशीर आणि भावनिक प्रवास — एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजचा!

या चित्रपटात ललित प्रभाकरसोबत अभिनेत्री ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित झळकणार आहेत. त्याचबरोबर स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांच्यासारख्या दमदार कलाकारांची विशेष उपस्थिती चित्रपटाला अधिक रंगतदार बनवते. आबुराव आणि बाबुराव ही त्यांची पात्रं टीझरमध्ये हास्याची चुणूक दाखवतात.

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “आजच्या तरुण पिढीच्या प्रेमाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात खूप बदल झाला आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही त्या बदलाचा आरसा ठरेल.” दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचं म्हणणं आहे, “ही एक फ्रेश आणि हटके प्रेमकथा आहे जी व्हिज्युअल इफेक्ट्सद्वारे अधिक खास बनली आहे.”

या चित्रपटाच्या कथेत प्रेम, नशीब, संधी आणि निवड यांचा अनोखा संगम आहे. विनोद, भावना, आणि कल्पनारम्यतेचं मनमोहक मिश्रण असलेला हा चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट’ या यशस्वी ब्रँडला पुढे नेणारा ठरणार आहे.

चित्रपटाच्या टीझरमधून साकार झालेला ‘दुसरी संधी मिळालेलं प्रेम’ हा विषय, प्रेक्षकांच्या हृदयाशी थेट जोडणारा आहे. त्यामुळे आता हे प्रेम अखेर एका अरेंज मॅरेजपर्यंत पोहोचतं का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!