मुंबई, दि. १७ जुलै २०२५ : Bin Lagnachi Goshta Film मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि चाहतेप्रिय जोडप्यांपैकी एक असलेले प्रिया बापट आणि उमेश कामत तब्बल १२ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. ‘बिन लग्नाची गोष्ट’ या हटके संकल्पनेवरील आगामी मराठी चित्रपटातून ही जोडी पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये प्रिया बापट आत्मविश्वासपूर्ण मिश्कील चेहऱ्याने हाताची घडी घालून उभी आहे, तर उमेश कामत डोक्यावर मुंडावळ्या बांधून आणि हार हातात घेऊन लग्नासाठी तयार असल्यासारखा दिसतो. मात्र या दृश्यामागे एक वेगळीच कथा लपलेली आहे, कारण ही गोष्ट पारंपरिक विवाहसंस्थेपेक्षा वेगळी – ‘बिन लग्नाची’ – अशी आहे.
चित्रपटाचा विषय जितका समकालीन, तितकाच संवेदनशीलही आहे. नातेसंबंध, समज-गैरसमज, आणि सामाजिक चौकटीबाहेर विचार करणाऱ्या प्रेमकथा मराठी प्रेक्षकांनी नेहमीच उचलून धरल्या आहेत. अशा कथांमध्ये वास्तवाचा आरसा असतो आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ हाच आरसा घेऊन येतो.
चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे सांगतात,(Bin Lagnachi Goshta Film)
“ही गोष्ट आहे नात्यांमधील गाठी सुटण्याची, एकमेकांना समजून घेण्याची, आणि जुन्या चौकटींना न मोडता त्यात नव्याने अर्थ शोधण्याची. ही कहाणी प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या नात्यांशी जोडेल आणि काही नवीन प्रश्नांवर विचार करायला लावेल. हलक्याफुलक्या संवादांतून आणि वास्तववादी घटनांद्वारे सांगितलेली ही प्रेमकथा आजच्या काळातील आहे.”
चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य यांचंही मत महत्त्वाचं आहे. ते म्हणतात,
“प्रिया आणि उमेशची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री ही प्रेक्षकांसाठी कायमच खास राहिली आहे. तीच केमिस्ट्री पुन्हा एकदा दाखवण्याची संधी या चित्रपटातून मिळाली, याचा आनंद आहे. ‘बिन लग्नाची गोष्ट’ ही फक्त एक प्रेमकथा नसून, नात्यांच्या गुंतागुंतीची आणि स्वतःला शोधण्याची एक सडेतोड मांडणी आहे.”
गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि., एस. एन. प्रॉडक्शन्स, आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या जोडीबरोबर काही नवीन आणि अनुभवी कलाकारांचाही समावेश आहे. निर्मात्यांमध्ये सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य यांचा समावेश आहे.
आजच्या पिढीला लग्न, जबाबदाऱ्या, स्वातंत्र्य आणि प्रेम यांच्यात समतोल साधताना अनेक निर्णय घ्यावे लागतात. काही वेळा त्या निर्णयात विवाह नसतोच, पण प्रेम टिकवण्याचा प्रयत्न असतो. अशीच एक “लग्न नसलेली पण नातं असलेली गोष्ट” प्रेक्षकांसमोर येणार आहे.
१२ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र येणारी ही हिट जोडी, वेगळ्या धाटणीची प्रेमकथा, आणि विवाहसंस्थेबाहेरचा दृष्टिकोन — हे सगळं मिळून ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाला एक वेगळी ओळख देणार आहे. या चित्रपटाची वाट बघणं प्रेक्षकांसाठी खरोखरच रोमांचक ठरणार आहे.
[…] प्रिया बापट आणि उमेश कामत बारा वर्षां… […]