“मी रमी खेळत नव्हतो,राजीनामा देण्यासारखे घडलं तरी काय?”- माणिकराव कोकाटे

0

नाशिक, २२ जुलै २०२५ – Manikrao Kokate Rummy Video “मी ऑनलाईन रमी खेळत नव्हतो, किंबहुना मला ती खेळताही येत नाही. माझ्यावर खोटे आरोप झाले आहेत. मी दोषी नाही, त्यामुळे राजीनामा देण्यासारखं काहीच घडलं नाही,” अशी स्पष्ट भूमिका कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. आपल्या विरुद्ध सुरू असलेल्या आरोपांवर त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

“माझ्या विरोधकांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही!”(Manikrao Kokate Rummy Video)
मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या अफवांवर पूर्णविराम देत कोकाटे म्हणाले, “मी माझ्या कामात प्रामाणिक आहे. मी ऑनलाईन रमी खेळत नाही, याचे मोबाईल डिटेल्स, सीडीआर (Call Detail Record) आणि बँक व्यवहार तपासले जावेत. जर दोषी आढळलो तर मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीला भेटल्याशिवाय राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन.”

त्यांनी स्पष्ट केले की, “मी असा कोणताही मोबाईल नंबर किंवा बँक अकाऊंट रमीसारख्या अ‍ॅप्लिकेशनला जोडलेला नाही. माझ्या व्हिडिओचा काही सेकंदाचा भाग दाखवून माझी बदनामी केली जात आहे.”

काय घडलं नेमकं?
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते सभागृहात मोबाइलवर काही पाहताना दिसत होते, आणि विरोधकांचा आरोप होता की कोकाटे ऑनलाइन रमी (Online Rummy Game) खेळत होते. राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत कोकाटेंवर टीकेचा भडिमार केला होता.

“हा प्रकार विनाकारण वाढवला जातोय”
कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी नवीन मोबाईल वापरत होतो. माझ्या ओएसडीकडून माहिती घेण्यासाठी मोबाईल मागवला होता. त्या मोबाईलवर काही गेम्सचे पॉप-अप्स आले. मी तो गेम स्कीप करत होतो, पण त्याचा फक्त 11 सेकंदांचा व्हिडीओ वायरल केला गेला. संपूर्ण व्हिडीओ दाखवला गेला असता, तर आरोपांचं फोलपण स्पष्ट झालं असतं.”

“रमी खेळायला मोबाईल नंबर, बँक अकाऊंट जोडावे लागते”
कोकाटे यांनी रमीसंबंधीची सविस्तर माहिती देताना सांगितले, “ऑनलाईन रमी खेळण्यासाठी बँक खातं आणि मोबाईल नंबर अ‍ॅप्लिकेशनला जोडावा लागतो. माझं कोणतंही डिटेल तिथं जोडलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही चौकशीस मी तयार आहे.”

“शेतकऱ्यांच्या हितासाठी नवी योजना”
राजीनाम्यावर चर्चा न करता कोकाटे यांनी एक नवी कृषी योजना जाहीर केली. “कृषी समृद्धी योजना” अंतर्गत ५,००० कोटींच्या भांडवली गुंतवणुकीस मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून त्याचा जीआरही काढण्यात आला आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“माझा पाय तिरका पडला तर म्हणतात…!”
मीडियाच्या काही वृत्तांकनांवर नाराजी व्यक्त करत कोकाटे म्हणाले, “माझा पाय तिरका पडला तरी लगेच बातमी होते की कृषीमंत्र्यांचा पाय तिरका पडला, मग लगेच प्रतिक्रिया येतात – ‘दारू प्यालाय काय?’, ‘गांजा घेतला काय?’, ‘समोर बाई होती का?’ – हे सगळं हास्यास्पद आहे.”

“सीडीआर तपासा, चौकशी करा!”
माणिकराव कोकाटे यांनी अधिकृत चौकशीची मागणी करत सांगितले, “या प्रकरणात सीडीआर तपासावा. कोणी व्हिडीओ बनवला, कुठून वायरल केला, हे सर्व तपासावं. विरोधकांना चुकीचे आरोप केल्याबद्दल मी कोर्टात खेचणार आहे आणि अब्रुनुकसानीचा दावा देखील करणार आहे.”

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ऑनलाईन रमी खेळण्याच्या आरोपांमुळे निर्माण झालेला वाद आता आणखी गडद होत चालला आहे. त्यांनी आपल्या बाजूने सुस्पष्ट भूमिका मांडत राजीनाम्याच्या चर्चा फोल ठरवल्या आहेत. मात्र, या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच राहतील.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!