प्रियदर्शन जाधव ‘चला हवा येऊ द्या –कॉमेडीचं गॅंगवॉर’मध्ये तिहेरी भूमिकेत झळकणार!

0

मुंबई, दि. २२ जुलै २०२५ – Chala Hawa Yeu Dya झी मराठीवरील प्रेक्षकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा नव्या पर्वासह सज्ज होत असून, यावेळी प्रेक्षकांसमोर येणार आहे ‘कॉमेडीचं गॅंगवॉर’. या पर्वाची खासियत म्हणजे या वेळेस आपल्या लाडक्या प्रियदर्शन जाधवची तिहेरी भूमिका. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिन्ही रूपांत प्रेक्षकांना हास्याची मेजवानी मिळणार आहे.

चित्रपट, रंगभूमी, वेब सिरीज अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रियदर्शनने या नव्या पर्वात धमाकेदार पुनरागमन केले आहे. “‘फु बाई फु’पासून मी या टीमचा भाग होतो, पण प्रवास अर्धवट राहिला होता. आता मात्र ‘चला हवा येऊ द्या – कॉमेडीचं गॅंगवॉर’च्या निमित्ताने घरी परतल्यासारखं वाटतंय,” असं तो आवर्जून सांगतो.

या पर्वात केवळ अभिनयच नव्हे, तर स्कीट लेखन आणि काही प्रमाणात दिग्दर्शनाची जबाबदारीही प्रियदर्शनच्या खांद्यावर आहे. त्याने सांगितलं की या पर्वाची जबाबदारी अधिक आहे, कारण गेली १० वर्षं प्रेक्षकांनी या कार्यक्रमावर अपार प्रेम केलं आहे आणि आता त्याच दर्जाचा विनोद आणि नवकल्पना सादर करण्याचे मोठे आव्हान आहे.

या नव्या पर्वात खास म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या नवोदित हास्यकलाकारांना संधी देण्यात आली आहे. “या पर्वाचे खरे स्टार हेच उपभरते कलाकार असतील. त्यांच्या जोडीने आम्ही एकत्र काम करतोय. माझ्या जोडीला प्रतिभावान लेखक आणि दिग्दर्शकांची टीम आहे,” असं प्रियदर्शन म्हणतो.

शूटच्या पहिल्याच दिवशी भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि गौरव मोरे यांच्या सोबतचा अनुभव अत्यंत धमाल होता. “या सर्वांसोबत पूर्वी काम केलं आहे. गौरवबरोबर मात्र प्रथमच काम करण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि शुभेच्छा मिळाल्यामुळे जबाबदारी अजून वाढली आहे,” असंही तो शेवटी म्हणतो.

(Chala Hawa Yeu Dya)प्रेक्षकांसाठी हास्याची ही पर्वणी २६ जुलैपासून शनि-रवि रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!