महाराष्ट्रात ठाकरे बंधुंच्या युतीचं पहिलं पाऊल:ठाकरे बंधूंची ‘लिटमस टेस्ट’-१८ ऑगस्टला

0

मुंबई, दि. ६ ऑगस्ट २०२५ Thackeray brothers alliance महाराष्ट्रात ठाकरे बंधूंची युती आता प्रत्यक्ष मैदानात उतरली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बेस्ट कामगार पतसंस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच एका व्यासपीठावर युतीची घोषणा केली आहे. १८ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण ही निवडणूक आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘लिटमस टेस्ट’ मानली जात आहे.

उद्धव-राज ठाकरेंची पहिली युती : BEST वर पहिली परीक्षा(Thackeray brothers alliance)

बेस्ट कामगार पतसंस्था ही मुंबईतील मराठी कामगारांचं आर्थिक हक्काचं व्यासपीठ मानली जाते. गेली नऊ वर्षे शिवसेनेच्या वर्चस्वाखाली असलेल्या या संस्थेत, यंदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज ठाकरे यांच्या मनसेशी हातमिळवणी केली आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रित पॅनल जाहीर करत ही युती अधिकृत केली आहे.

‘मराठी माणसाचा झेंडा’ पुन्हा?

मराठी कामगारांच्या पाठबळावर उभ्या राहिलेल्या या पतसंस्थेच्या निवडणुकीत “मराठी माणसाचा झेंडा” पुन्हा एकदा फडकवण्याचा निर्धार ठाकरे बंधूंनी केलाय. ही युती केवळ निवडणुकीपुरती न राहता, भविष्यातील मुंबई पालिकेच्या राजकारणाचं चित्रही बदलू शकते, असं निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी नोंदवलं आहे.

बेस्ट युतीचा राजकीय शुभशकून?

राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या कार्यकर्त्यांना “आपसांत वाद घालू नका” असा संदेश देत आगामी निवडणुकीत मनसे १०० टक्के सत्तेत येईल असा दावा केला होता. त्यानंतर लगेच झालेली ही युती ‘पहिला शुभशकून’ म्हणून पाहिली जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद टाळाटाळीत

या युतीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता, त्यांनी “राष्ट्रीय मुद्द्यांवर बोला” असं म्हणत भाष्य करण्यास टाळाटाळ केली. यावरून शिंदे गटाला या युतीची भीती वाटत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

महायुती विरुद्ध ठाकरे बंधू सामना तापतोय!

महायुतीच्या नेत्यांनी ठाकरे ब्रँडवर टीका सुरू केली असली, तरी बेस्ट निवडणुकीत या ब्रँडची ताकद किती आहे, हे सिद्ध होणार आहे. बेस्टची ही निवडणूक म्हणजे पालिका निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे.

राज ठाकरेंचा छोट्या पक्षांकडे कल?

राज ठाकरे शेकापच्या व्यासपीठावर हजर होते आणि बच्चू कडूंशी भेटीची तयारी करत आहेत. प्रहार पक्षाच्या आंदोलनाला मनसेने आधीच पाठिंबा दिला आहे. यावरून स्पष्ट होतं की राज ठाकरे छोट्या पक्षांना एकत्र करून जिल्हानिहाय आघाड्या उभ्या करू इच्छितात.

राजकीय समीकरण बदलणार?

राज ठाकरे भाजपकडे जाणार नाहीत, हे विरोधक मान्य करत आहेत. दुसरीकडे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत युती न केल्यास राज छोट्या पक्षांसोबत स्वतंत्र आघाडी तयार करू शकतात. यामुळे राज्यातील त्रिकोणी स्पर्धा चौरसात रुपांतर होण्याची चिन्हं आहेत.

बेस्ट निवडणुकीतून पुढील संकेत मिळणार

ठाकरे बंधूंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. बेस्ट निवडणुकीत या युतीचा निकाल हेच सांगेल की मराठी माणूस कोणासोबत आहे.” असं शिवसेना आणि मनसेतील सूत्रांनी सांगितलं.

१८ ऑगस्टच्या निकालाची उत्सुकता शिगेला

बेस्ट कामगार पतसंस्थेची निवडणूक केवळ आर्थिक संस्था निवडणूक न राहता, ती ठाकरे बंधूंच्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात ठरेल की महायुतीच्या वर्चस्वाची पुनरावृत्ती हे ठरवणारी ठरणार आहे. १८ ऑगस्टच्या ‘लिटमस टेस्ट’चा निकाल महाराष्ट्राचं राजकारण कशा दिशेने वळेल, याचे संकेत देईल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!