राज्यात पावसाचा हाहाकार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी

0

मुंबई, दि. १८ ऑगस्ट २०२५ Maharashtra Heavy Rain गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी भारतीय हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान, सहा जणांचा मृत्यू(Maharashtra Heavy Rain)

पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यात बसला आहे. नांदेड, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सहा जणांचा बळी गेला आहे. यामध्ये नांदेडमध्ये तीन, बीडमध्ये दोन तर हिंगोलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक गावांमध्ये घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील २५ हून अधिक गावांमध्ये पाणी शिरले असून, शेतकऱ्यांची खरीप पिके जलमय झाली आहेत. बीडमध्ये नद्यांना पूर आला आहे. हिंगोलीत नदीकाठावरील गावे धोक्याच्या क्षेत्रात आली आहेत. महसूल विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील तब्बल ५७ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मुंबईची तुंबई जनजीवन विस्कळीत

मुंबईत पावसाने अक्षरशः तुंबई केली आहे. सायन, माटुंगा, किंग सर्कल, घाटकोपर यांसारख्या सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते बंद झाले आहेत. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रवाशांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली. चुनाभट्टी येथे एमएमआरडीएची भिंत कोसळून सात झोपड्यांचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.रस्त्यांवर वाहने बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. काही ठिकाणी शाळकरी मुलांच्या बस आणि रुग्णवाहिका अडकल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ मदत करून त्यांना सुरक्षित बाहेर काढले. शीव आणि विलेपार्ले येथे पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.

शाळांना सुट्टी खबरदारीचा निर्णय

हवामान खात्याने मुंबई व उपनगरात १९ ऑगस्टसाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या (१९ ऑगस्ट) सुट्टी जाहीर केली आहे.ठाणे महापालिकेने देखील एक्स (माजी ट्विटर) वरून माहिती दिली की, १८ आणि १९ ऑगस्ट रोजी ठाण्यातील सर्व शाळा बंद राहतील.याशिवाय पालघर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, रायगड या जिल्ह्यांमध्येही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये देखील स्थानिक प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी स्पष्ट केले की, “जिथे रेड किंवा ऑरेंज अलर्ट आहे आणि पूरसदृश परिस्थिती आहे, तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा.”

मुख्यमंत्र्यांचा आढावा मदतकार्याला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागात पंचनामे करून तातडीने मदत पोहोचवावी, तसेच कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत.आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफच्या पथकांना सतर्क ठेवण्यात आले आहे. कोकण व घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, विशेषतः पूरग्रस्त भागात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. कोकणात समुद्र खवळलेला असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतील नद्यांची पातळी वाढत असून, पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

जनजीवन विस्कळीत, पण मदतीचा हात पुढे

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी बचाव कार्य सुरू आहे. अनेक सामाजिक संघटना पूरग्रस्तांना अन्न व पिण्याचे पाणी पुरवत आहेत. स्वयंसेवी संस्था, स्थानिक नागरिक आणि प्रशासन एकत्र येऊन परिस्थिती हाताळत आहेत.मुंबईतील तरुणांनी सोशल मीडियावर हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी अनेकांनी आपली घरे उघडी केली आहेत.

पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी प्रशासनाचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यातील मृत्यू, मुंबईतील वाहतूक विस्कळीत व्यवस्था, शाळांना सुट्टी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठका या सर्व घडामोडींमुळे परिस्थिती गंभीर आहे. मात्र प्रशासन, पोलीस आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मोठी आपत्ती टळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!