मुंबई, दि. १९ सप्टेंबर २०२५ – Dashavatar Marathi Movie Review ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले असून, या चित्रपटाला आता राजकीय स्तरावरही दाद मिळू लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सिनेमाविषयी गौरवोद्गार काढत, “चित्रपटाची कथा जरी कोकणातील असली, तरी त्यातली व्यथा ही संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आपण आज कुठे आहोत आणि कुठे चाललो आहोत याचे आत्मपरीक्षण करणारा हा भव्य प्रयत्न आहे,” अशा शब्दांत दिग्दर्शक आणि कलाकारांच्या कामाची प्रशंसा केली.
खास शो ला ठाकरे कुटुंब उपस्थित (Dashavatar Marathi Movie Review)
‘दशावतार’चा खास शो ठाकरे कुटुंबासाठी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे उपस्थित होते. खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी, अभिनेत्री राणी गुणाजी तसेच जागतिक कीर्तीच्या अभिनेत्री छाया कदम यांचीही उपस्थिती होती.
कलाकार आणि दिग्दर्शकांचे कौतुक
चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्या कामाची उद्धव ठाकरेंनी विशेष प्रशंसा केली. “मराठी चित्रपटसृष्टीला एक परिपूर्ण आणि विचार करायला लावणारा चित्रपट दिल्याबद्दल खानोलकर अभिनंदनास पात्र आहेत,” असे ते म्हणाले.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकल्याचे ते म्हणाले. तसेच सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, अजित भुरे यांच्यासह संपूर्ण टीमचे त्यांनी कौतुक केले.
भव्यतेचा अनुभव रूपेरी पडद्यावरच
“आपण कित्येक काळानंतर मराठीत असा भव्य चित्रपट पाहिला. ही भव्यता, हे सौंदर्य, रसिकांनी घरच्या पडद्यावर नव्हे तर रूपेरी पडद्यावरच अनुभवायला हवे. केवळ कोकणातीलच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राने ‘दशावतार’ मोठ्या पडद्यावर पहावा,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
निर्मात्यांचेही अभिनंदन
झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर, निर्माता सुजय हांडे, दिग्दर्शक सुबोध खानोलकर, ओंकार काटे आणि सर्व निर्मात्यांचेही उद्धव ठाकरेंनी अभिनंदन केले. “दशावतार’ने मराठी चित्रपटसृष्टीला नवी भव्यता मिळवून दिली आहे,” असे ते म्हणाले.