मुंबई, दि. २६ सप्टेंबर २०२५ – Dashavatar Marathi Movie झी स्टुडिओजची प्रस्तुती आणि सुबोध खानोलकर लिखित-दिग्दर्शित ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले आहे. पहिल्याच आठवड्यात हाऊसफुल्ल शोजची मालिका सुरू झाल्यानंतर तीन आठवडे उलटूनही चित्रपटाचा उत्साह कमी झालेला नाही. मुंबईत प्राईम लोकेशन्सवरील थिएटर्सपासून ते कोकणातील छोट्या शहरांपर्यंत सर्वत्र ‘दशावतार’चीच चर्चा रंगली आहे.
मुंबईत प्राईम थिएटर्समध्ये हाऊसफुल्ल (Dashavatar Marathi Movie)
मराठी चित्रपटांना सहसा मर्यादित थिएटर्स मिळतात, विशेषत: मराठा मंदिर, रॉक्सी, स्टर्लिंग, इरॉस, रिगल, आयनॉक्स, पॅलेडियम पीव्हीआर यांसारख्या प्राईम लोकेशन्सवर फारच कमी मराठी चित्रपट टिकतात. मात्र ‘दशावतार’ने या समजुतींना छेद देत सलग तीन आठवडे हाऊसफुल्ल शोज दिले आहेत. हिंदी-इंग्रजी चित्रपटांची मक्तेदारी असलेल्या या ठिकाणी ‘दशावतार’ने अमराठी प्रेक्षकांनाही थिएटरकडे खेचले आहे, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवी ऊर्जा देणारी बाब ठरली आहे.
कोकणात अभूतपूर्व प्रतिसाद
बॉलिवूडचे दिग्गज चित्रपटही कोकणात क्वचितच हाऊसफुल्ल होतात. पण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, पेण, कणकवली, महाड, चिपळूण या भागातील प्रत्येक थिएटरमध्ये ‘दशावतार’ने विक्रमी प्रतिसाद मिळवला आहे. स्थानिक प्रेक्षकांनी पर्यावरण, निसर्ग, कोकणी माणूस आणि दशावतार कलेवर आधारित कथानकाला मोठ्या आत्मीयतेने दाद दिली. “खूप दिवसांनी आपल्या मातीतून आलेली गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतेय,” अशी प्रतिक्रिया तेथील प्रेक्षकांनी दिली.
सामाजिक चळवळ उभी करणारा चित्रपट
हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता कोकणातील पर्यावरण संरक्षण, देवराया जपण्याची भावना आणि दशावतारी कलेचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांना चालना देतोय. स्थानिक जमिनी व कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करण्यातही या चित्रपटाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
दमदार कलाकार आणि तंत्रज्ञानाची जोड
‘दशावतार’चे लेखन-दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले असून निर्माते म्हणून सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांचा सहभाग आहे. अजित भुरे हे सृजनात्मक निर्माते असून कलाकारांमध्ये दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे आणि आरती वडगबाळकर यांच्या भूमिका विशेष उठून दिसत आहेत.
बॉक्स ऑफिसवर तुफानी यश आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘दशावतार’ हा चित्रपट केवळ व्यावसायिकदृष्ट्या नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्याही मराठी चित्रपटसृष्टीचा मैलाचा दगड ठरत आहे.
[…] मुंढेगाव येथील ४७ हेक्टर जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला हस्तांतरित करण्याचे […]