नाशिक, दि. ७ ऑक्टोबर २०२५ – Nashik Collector Transfer राज्य शासनाने आज (ता. ७) रात्री उशिरा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून, नाशिकच्या जिल्हा प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. नाशिकचे विद्यमान जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (NMRDA) आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिकचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
यासोबतच राज्य शासनाने कुंभमेळा आयुक्त पदावर शेखर सिंग यांची नेमणूक जाहीर केली असून, येणाऱ्या २०२७ च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
जलज शर्मा यांनी नाशिक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कार्यकाळात विविध विकासकामांना गती दिली. जिल्ह्यातील प्रशासनिक कामकाजात पारदर्शकता, जलसंधारण मोहिमेत सक्रिय सहभाग, तसेच स्मार्ट सिटी आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांची बदली नाशिकच्या NMRDA आयुक्तपदी झाल्याने ते शहर नियोजन, विकास आराखडे आणि नवीन प्रकल्पांच्या मंजुरी प्रक्रियेत आता महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत.
( Nashik Collector Transfer)दुसरीकडे, नाशिक जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कार्यक्षम, काटेकोर आणि तंत्रज्ञानाचा वापर करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. जळगावमध्ये त्यांनी प्रशासनिक सुधारणा, जनसंपर्क आणि शेतकरी हिताच्या योजना प्रभावीपणे राबवल्या होत्या. नाशिकसारख्या औद्योगिक, धार्मिक आणि कृषी महत्त्वाच्या जिल्ह्याचे प्रशासन सांभाळताना त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल, असे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.
नाशिकमध्ये कुंभमेळा, औद्योगिक गुंतवणूक, द्राक्षनगरी विकास आणि ग्रामीण भागातील शाश्वत प्रगती या सर्व आघाड्यांवर नवे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि NMRDA आयुक्त जलज शर्मा यांच्या सहकार्याने प्रशासनाकडून नव्या ऊर्जा आणि गतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.