
नाशिक,दि,२३ ऑक्टोबर २०२५ –Padwa Pahat Nashik दिवाळीच्या आनंदमय वातावरणात, गोदाकाठच्या नेहरू चौकात ‘संस्कृती नाशिक’च्या वतीने आयोजित पाडवा पहाट हा स्वरमंचाचा विलक्षण सोहळा रंगला. लक्ष्मी-कुबेर पूजेनंतरच रात्रीच्या शांततेतून सूरांचा झरा फुटला आणि पहाटे सव्वा पाचच्या सुमारास ब्रह्मावृंदाच्या मंत्रघोषात या अनोख्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या वर्षी पाडवा पहाटेचं प्रमुख आकर्षण ठरले रामपूर-सहस्वान घराण्याचे युवा गायक उस्ताद अरमान खान. महान गायक स्व. उस्ताद रशीद खान यांच्या गायकीची परंपरा पुढे नेत, अरमान खान यांनी आपल्या गंभीर आणि सुरेल सादरीकरणाने नाशिककर रसिकांना थक्क केले. ‘मिया की तोडी’ रागातील ‘अब मोरे राम…’ या विलंबित खयालाने कार्यक्रमाला गंभीर आणि आध्यात्मिक रंग चढवला, तर ‘अब मोरी नैया पार करो’ या द्रुतलयीत बंदिशीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

उस्ताद खान यांना साथ लाभली नाशिकचे सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित सुभाष दसककर, तबलावादक उन्मेश बॅनर्जी आणि बासरीवादक रिक मुखर्जी यांची.त्यांच्या सुरेल आणि सुसंवादी साथीनं वातावरणात दिव्य लय निर्माण झाली
(Padwa Pahat Nashik)कार्यक्रमाच्या मध्यंतरात संस्कृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.उस्ताद अरमान खान आणि ज्येष्ठ रंगभूषाकार माणिक नाना कानडे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात आले. तसेच वादक उन्मेश बॅनर्जी, रिक मुखर्जी आणि पं. सुभाष दसककर यांचाही यथोचित सन्मान झाला.

संस्कृती नाशिकचे अध्यक्ष मा. शाहू खैरे यांनी या पाडवा पहाटेच्या संकल्पनेविषयी बोलताना सांगितले की, “संगीत हीच आपल्या संस्कृतीची पहाट आहे; आणि अशा उपक्रमांमधूनच नाशिक संगीत नगरी म्हणून उजळते.”
उत्तरार्धात ‘देशकार’ रागातील ‘हू तो तेरे कारण..’ या सादरीकरणाने श्रोत्यांना एका गूढ भावविश्वात नेले. त्यानंतर ‘आकल्प आयुष्य’ या भजनाने वातावरण भक्तीमय झाले, तर शेवटच्या ‘राम नाम’ भैरवीने या स्वरयात्रेची सांगता अत्यंत प्रभावीपणे झाली.

या कार्यक्रमाला नाशिकचे खासदार मा. राजाभाऊ वाजे, खासदार सौ. शोभा बच्छाव, आदिवासी विकास आयुक्त मा. लीनाताई बनसोड, मा. राधाकृष्ण गमे साहेब, ॲड. नितीन ठाकरे, मा. विलास शिंदे, मा. यतीन वाघ, मा. अशोक मुर्तडक, मा. गुलाम ताहीर शेख, मा. लक्ष्मण सावजी, ॲड. सुरेश भटेवरा, मा. गुरमीत बग्गा, मा. शरद आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.रसिकांच्या उत्स्फूर्त दादीनं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि पिंपळपारावरील ही ‘पाडवा पहाट’ नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासात स्मरणीय ठरली.



