
नाशिक, दि. ८ नोव्हेंबर २०२५ – Nashik Kumbh Mela 2027 येत्या २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक पर्व नसून, महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रासाठी जागतिक पातळीवर ब्रॅण्डिंगची मोठी संधी आहे, असे मत राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी व्यक्त केले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांना विकासकामांना गती देण्याचे आणि सूक्ष्म नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या बैठकीस नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, विभागीय आयुक्त व कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिवांनी सांगितले की, “प्रयागराज कुंभमेळ्याच्या अनुभवावरून नाशिकमध्ये भाविकांची संख्या विक्रमी असेल. त्यामुळे गर्दी नियंत्रण, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करणे गरजेचे आहे.” भाविकांना पार्किंगपासून स्नान स्थळापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी ॲप, पोर्टल आणि डिजिटल माध्यमांतून सर्व माहिती पूर्वीच उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सुचवले.
त्यांनी पुढे सांगितले की, “हा कुंभमेळा स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा संकल्प प्रत्येक यंत्रणेने करावा. यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि स्थानिक लोकसहभाग वाढवावा.”
कुंभमेळ्याच्या काळात महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि परंपरा जगासमोर सादर होईल, यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मागील कुंभमेळ्यात काम केलेल्या अनुभवी अधिकारी-कर्मचाऱ्यांची मदत या वेळी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
राजेशकुमार यांनी सांगितले की, “विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, जलसंपदा, आरोग्य केंद्रे, वाहतूक व्यवस्था, महावितरण आणि पोलिस यंत्रणा यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत कुंभमेळ्याच्या काळात अर्धवट कामे राहू नयेत.”
त्यांनी विशेषतः आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत ठेवण्याचे आणि आवश्यक साधनसामुग्रीसह मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. पर्वणीच्या दिवशी वाढत्या गर्दीचा विचार करून बंदोबस्ताचे पूर्वनियोजन करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित विभागांना दिले.
या बैठकीत प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कामांचे सविस्तर सादरीकरण केले. तसेच रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, जलसंपदा आणि रस्ते विकास महामंडळ यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
मुख्य सचिवांनी शेवटी सर्व विभागांना उद्देशून सांगितले –(Nashik Kumbh Mela 2027)
“कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून, महाराष्ट्राचे जागतिक पातळीवर ब्रॅण्डिंग करणारा एक भव्य सांस्कृतिक उत्सव आहे. प्रत्येक यंत्रणेने जबाबदारीने आणि समन्वयाने काम करून हा मेळा ‘शून्य अपघात आणि शून्य आपत्ती’चा आदर्श ठरवावा.”


