
नाशिक दि. ७ डिसेंबर २०२५ –Saptashrungi Gad Accident सप्तशृंगगड दर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला कोसळला. गणपती पॉइंट परिसरात एमएच-15 BN 0555 या इनोव्हा कारचा भीषण अपघात होऊन सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
🔴 कसा झाला अपघात?(Saptashrungi Gad Accident)
सप्तशृंगगडावरील घाटरस्त्यावरून खाली उतरताना चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. कारने संरक्षण कठडा तोडत सुमारे ८०० ते १००० फूट खोल दरीत कोसळत थरारक अपघात घडला. दरी अतिशय खोल आणि खडकाळ असल्याने बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
पिंपळगाव चिंचखेड येथील एकाच कुटुंबातील भाविकांचा या अपघातात करुण अंत झाला. मृतांची नावे —
कीर्ती पटेल,रसीला पटेल,विठ्ठल पटेल,लता पटेल,पचन पटेल,मणिबेन पटेल हे सहा जण जागीच ठार झाले असून कार पूर्णपणे चक्काचूर अवस्थेत आढळून आली.
🚒 बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. दरी खोल असल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तासन्तास प्रयत्न करावे लागले. हे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला.
⚠️ स्थानिकांचा संताप : ‘गलथान प्रशासन जबाबदार’
सप्तशृंगगड परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर (PWD) गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे म्हणणे—घाटरस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू नाही,संरक्षण कठडे कमकुवत व जीर्ण ,सुरक्षा उपाययोजना शून्य,“PWD च्या गलथान कारभारामुळेच ही घटना घडली. संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बेनके आणि सदस्य राजेश गवळी यांनी केली.
परिसरात शोककळा
या हृदयद्रावक दुर्घटनेने पिंपळगाव आणि सप्तशृंगगड परिसरात अत्यंत शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



