व्ही. शांताराम चित्रपटातील ‘जयश्री’च्या भूमिकेत तमन्ना भाटिया
पहिलं मोहक पोस्टर जाहीर; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

मुंबई, दि. १० डिसेंबर २०२५ – V Shantaram Biopic भारतीय सिनेमातील दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित भव्य सिनेमाची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत चांगलीच रंगली आहे. सिद्धांत चतुर्वेदी यांच्या रूपातील ‘व्ही. शांताराम’ची पहिली झलक समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. त्यातच आता चित्रपटातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाची व्यक्तिरेखा ‘जयश्री’ची पहिली झलक निर्मात्यांनी सादर केली असून, ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारत असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया गुलाबी साडीत अत्यंत सोज्वळ, मोहक आणि नाजूक रूपात दिसत आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील कलात्मकता, शांतता आणि भावनांचा हलका स्पर्श पोस्टरमधून स्पष्ट जाणवत आहे. पोस्टरची भव्यता आणि त्या काळाचा प्रामाणिक कॅन्व्हास पाहता हा चित्रपट एका मोठ्या स्केलवर उभा राहत असल्याचे जाणवते.
चित्रपटातील ‘जयश्री’ ही व्यक्तिरेखा केवळ व्ही. शांताराम यांच्या पत्नीची नाही, तर त्यांच्या कलात्मक प्रवासातील पहिली प्रेरणा, सहप्रवासी आणि भावविश्वाचा आधारस्तंभ म्हणून उलगडणार आहे. सहकलाकार म्हणून सुरुवात झालेला प्रवास प्रेम, तणाव, नात्यांतील गुंतागुंत आणि त्या काळातील सिनेमाजगताचे पडद्यामागचे वास्तव यांची जुळवाजुळव या व्यक्तिरेखेतून प्रभावीपणे दिसणार आहे. व्ही. शांताराम आणि जयश्री यांच्यातील नात्याची गोडवेगळी, पण गुंतागुंतीची रसायनशास्त्र निर्माते या चित्रपटातून काळजीपूर्वक रेखाटत आहेत.
चित्रपटाच्या टीमने (V Shantaram Biopic)दिलेल्या माहितीनुसार, “जयश्री ही व्यक्तिरेखा भावनांनी आणि कलात्मकतेने परिपूर्ण आहे. तमन्ना भाटियाच्या सौंदर्यपूर्ण शालीनतेत आणि डोळ्यांतील भावनांमध्ये या व्यक्तिरेखेची ताकद नैसर्गिकपणे दिसते. ती या भूमिकेत जणू त्या काळातील जयश्रीचं पुनर्जन्म घेऊन आली आहे,” असे निर्मात्यांनी नमूद केले.
या आधी प्रदर्शित झालेल्या सिद्धांत चतुर्वेदी यांच्या लुकला मिळालेला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहता आता तमन्नाच्या पोस्टरमुळे चित्रपटातील भावनिक आणि कलात्मक थर अधिक गडद झाला आहे. दोघांच्या रसायनशास्त्राबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, पडद्यावर त्यांचा प्रवास पाहण्याची चाहत्यांमध्ये खूपच उत्कंठा दिसत आहे.
‘व्ही. शांताराम’ हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने निर्मित होत असून, निर्माते म्हणून राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे यांची साथ मिळाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.
नवीन वर्षात प्रदर्शित होणारा हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळाला उजाळा देणारा, भावस्पर्शी आणि भव्य असा सिनेमा ठरणार आहे. नव्या पिढीला सिनेमाच्या इतिहासातील एक महत्वाचा अध्याय पुन्हा अनुभवण्याची संधी या चित्रपटातून मिळणार आहे.



