prsanna

मोठी राजकीय घडामोड: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा

सदनिका गैरव्यवहार प्रकरणामुळे मंत्रिपद गमावले

0

मुंबई, दि. १७ डिसेंबर २०२५ Manikrao Kokate Resigns राज्याच्या राजकारणात आज एक मोठी आणि धक्कादायक घडामोड घडली आहे. राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, हा राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पोलीस अटकेची शक्यता निर्माण झाल्याने आणि न्यायालयीन निर्णयामुळे कोकाटे यांच्यावर राजीनाम्याची वेळ ओढवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत राज्यपालांकडे शिफारस केल्यानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी तात्काळ कारवाई करत माणिकराव कोकाटे यांची सर्व मंत्रीपदाची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद अधिकृतपणे संपुष्टात आले आहे.

अटकेची वेळ का आली?(Manikrao Kokate Resigns)

माणिकराव कोकाटे हे १९९५ सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याआधी, २० फेब्रुवारी २०२५ रोजी प्रथम वर्ग न्यायालयानेही त्यांना हीच शिक्षा सुनावली होती.न्यायालयाच्या या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. कायद्यानुसार दोषी ठरलेला व्यक्ती मंत्रीपदावर राहू शकत नाही, त्यामुळे राजकीय दबावही वाढत गेला. अखेर अटकेची शक्यता लक्षात घेता त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

हायकोर्टातूनही दिलासा नाही

अटक टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने तातडीच्या सुनावणीस नकार दिल्यामुळे त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. या निर्णयानंतर पोलीस प्रशासनाने अटकेची तयारी सुरू केल्याचे समोर आले होते.

रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार

अटकेची प्रक्रिया सुरू असतानाच माणिकराव कोकाटे यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरील ६०९ क्रमांकाच्या वॉर्डमधील आयसीयूमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी अचानक रुग्णालयात दाखल झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

या संपूर्ण घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत भ्रष्टाचाराविरोधातील कठोर पावले असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी या प्रकरणामागे राजकीय सूड असल्याचा आरोप केला आहे.माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे राज्य मंत्रिमंडळात रिक्तता निर्माण झाली असून, येत्या काळात नव्या मंत्र्याचा समावेश किंवा खातेवाटपात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, पुढील कायदेशीर आणि राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!