नरेडकोच्या होमेथॉन प्रदर्शनातून पर्यावरणपूरक विकासाचा संदेश – गिरीश महाजन
नरेडकोच्या होमेथॉन प्रदर्शनातून हरित नाशिकच्या दिशेने ठोस पावले

नाशिक, दि. १९ डिसेंबर २०२५ – (Homethon Property Expo 2025)नाशिक शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक धोरणे अत्यंत महत्त्वाची असून, ‘हरित नाशिक’ ही संकल्पना केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवली जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तसेच कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. नरेडको नाशिक आयोजित ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ला भेट देताना ते बोलत होते.
आपल्या भाषणात मंत्री महाजन म्हणाले की, “नरेडकोच्या या (Homethon Property Expo 2025) तिसऱ्या प्रदर्शनाला मी भेट देत असून, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणि सकारात्मक उपक्रम पाहायला मिळतो. हरित नाशिक या संकल्पनेचे ब्रँडिंग अतिशय प्रभावीपणे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला जेवढे ग्राहक भेट देतील, तेवढीच झाडे नाशिक शहरात बिल्डरांच्या लेआउटमध्ये लावण्याचा संकल्प अत्यंत कौतुकास्पद आहे. पर्यावरण संवर्धन आणि विकास यांचा समतोल साधण्याचा हा उत्तम प्रयत्न आहे.”
मंत्री महाजन यांनी वृक्षारोपणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आंध्र प्रदेशातून मी १५ हजार मोठी वृक्षरोपे नाशिकमध्ये वृक्षारोपणासाठी आणली असून, शहरातील विविध भागांमध्ये दररोज वृक्षारोपण सुरू आहे. हा आकडा केवळ १५ हजारांपुरता मर्यादित न राहता भविष्यात २० हजार, ४० हजार, अगदी ५० हजारांपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. जोपर्यंत नाशिककर पूर्णपणे समाधानी होत नाहीत, तोपर्यंत वृक्षारोपणाचा हा उपक्रम सुरूच राहील. त्यानंतरच तपोवनातील वृक्षतोडीबाबत कोणताही निर्णय घेतला जाईल.”
नरेडकोच्या कार्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “नरेडकोच्या माध्यमातून नाशिकमधील विविध भागांतील गृहप्रकल्पांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी मिळते. त्यामुळे घर खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना मोठी सुविधा उपलब्ध होते. नाशिक शहर आता वेगाने विकसित होत असून, देशपातळीवर नाशिकच्या विकासाचा वेग उल्लेखनीय आहे. देशातील अनेक भागांतील नागरिकांचे लक्ष नाशिककडे केंद्रित झाले आहे.”
नाशिक शहराची वैशिष्ट्ये सांगताना मंत्री महाजन म्हणाले की, “नाशिकमध्ये आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हवामान, धार्मिक वातावरण, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि शांतता यामुळे नाशिक निवृत्तीनंतर वास्तव्यासाठीही आदर्श शहर बनले आहे. त्यामुळेच घर खरेदीसाठी नागरिकांचा ओढा नाशिककडे वाढत आहे. पूर्वीचे नाशिक आणि आजचे नाशिक यामध्ये आमूलाग्र बदल झाला असून, या बदलाचे श्रेय येथील बिल्डर आणि विकासकांना जाते.”सामाजिक बांधिलकी जपत काही समाजसेवी संस्थांना मोफत स्टॉल देण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नरेडकोच्या वतीने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या सहकार्याबाबत माहिती देताना नरेडकोचे समन्वयक जयेश टक्कर यांनी सांगितले की,कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनात नरेडको सक्रिय सहभाग घेणार आहे.”तसेच “कुंभमेळ्याच्या काळात बिल्डरांकडे जे फ्लॅट्स उपलब्ध असतील, ते भाविकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच बिल्डरांच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागा शाही स्नानाच्या वेळी पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. असेहि आश्वासन ठक्कर यांनी या प्रसंगी दिले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तसेच कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे स्वागत व सत्कार होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर आणि नरेडकोचे सचिव शंतनु देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, सुनील बागुल, विजय साने, महेश हिरे, मुन्ना हिरे, सागर वैद्य, सुधाकर बडगुजर, हिमगौरी आडके तसेच नरेडको नाशिक शाखेचे अध्यक्ष सुनील गावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



