नाशिकमध्ये नाट्यपरिषदेच्या किमान दोन शाखा आवश्यक : श्याम लोंढे

एक शाखा आणि १४०० सभासद – दुर्दैवी वास्तव

1

नाशिक, दि. २४ डिसेंबर २०२५ Nashik Natya Parishad News अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या गुरुवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेचे निमंत्रण अनेक सभासदांपर्यंत पोहोचले नाही किंवा जाणीवपूर्वक पोहोचवले गेले नाही ? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असलेले सुप्रसिद्ध वस्तू विशारद, नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारे अभ्यासक तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे समिती प्रमुख श्याम लोंढे यांनी जनस्थानच्या बातम्यांची दखल घेत आपली स्पष्ट आणि परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नाशिकचा सांस्कृतिक वारसा आणि नाट्यपरिषद (Nashik Natya Parishad News)

श्याम लोंढे म्हणाले की, नाशिक हे केवळ धार्मिक शहर नसून महाराष्ट्रातील एक अत्यंत समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेले प्रमुख शहर आहे. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचे जन्मस्थान असलेले नाशिक हे भारतीय चित्रपटसृष्टीचे उगमस्थान मानले जाते. भारतातील पहिला सिनेमा आणि चित्रपट निर्मितीची मुहूर्तमेढ नाशिकमध्येच रोवली गेली. इतकेच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली फिल्म सिटीदेखील नाशिकमध्येच सुरू झाली, हे नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाचे मोठे उदाहरण आहे.

कोल्हापूरचे कलामहर्षी बाबुराव पेंटर, संगीत महर्षी पं. पलुसकर, नाट्य क्षेत्रातील तात्यासाहेब शिरवाडकर, कानेटकर यांसारख्या अनेक नामवंत लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकारांचे नाशिकशी घनिष्ठ संबंध होते. या सर्व दिग्गजांच्या योगदानामुळे नाशिकची ओळख केवळ शहर म्हणून नव्हे, तर सांस्कृतिक केंद्र म्हणून निर्माण झाली.

एक शाखा आणि १४०० सभासद दुर्दैवी वास्तव

आजच्या घडीला नाशिक शहराची वाढती लोकसंख्या, विस्तार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची वाढती संख्या पाहता केवळ एकच नाट्य परिषदेची शाखा असणे आणि जिल्ह्यात फक्त सुमारे १४०० सभासद असणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत श्याम लोंढे यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये नव्याने उभारी घेत असलेली तरुण कलाकारांची मोठी फळी केवळ नाशिकच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाने योगदान देत आहे.

अशा परिस्थितीत नाट्यपरिषदेच्या अधिक शाखा निर्माण होणे ही काळाची गरज आहे. पंचवटी, नाशिक रोड, सिडको यांसारख्या भागांमध्ये स्वतंत्र नाट्यपरिषदेच्या विभागीय शाखा स्थापन झाल्यास स्थानिक कलाकारांना सहभागी होण्यासाठी, संपर्क साधण्यासाठी आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी मोठी सोय होईल.

वृद्ध कलाकारांच्या व्यथा आणि योजनांतील त्रुटी

श्याम लोंढे यांनी नाशिकमधील वृद्ध कलाकारांच्या समस्यांकडेही लक्ष वेधले. आपण स्वतः वृद्ध कलावंत मानधन समितीत काम केले असल्याचा अनुभव सांगताना त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, या समितीच्या कामकाजात अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, “खरा कलाकार कोण?” हे ठरविण्याचे निकष अत्यंत साधे आणि त्रुटीपूर्ण आहेत.

याचा गैरफायदा घेत अनेक अनावश्यक आणि कला क्षेत्राशी थेट संबंध नसलेल्या लोकांनी शासनाच्या या चांगल्या उपक्रमांचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, खरे गरजू आणि आयुष्यभर कला जोपासणारे कलाकार वंचित राहत आहेत.

कलाकारांसाठी QR Code प्रणालीची मागणी

या समस्यांवर उपाय म्हणून श्याम लोंढे यांनी अभिनव आणि ठोस उपाय सुचवला आहे. प्रत्येक कलाकाराचा QR Code जनरेट केला जावा, अशी त्यांची ठाम मागणी आहे. या QR Code मध्ये कलाकाराची संपूर्ण माहिती, त्याचे कलात्मक योगदान, संपर्क तपशील आणि ओळख नोंदवली जाईल. यामुळे खरा कलाकार कोण आहे हे सहज सिद्ध होईल आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल.तसेच, या माध्यमातून कलाकारांशी थेट संपर्क साधणे, त्यांच्या समस्यांची नोंद घेणे आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी नमूद केले.

नाट्यपरिषद आणि कलाकार यांच्यातील दुवा मजबूत हवा

नाट्यपरिषद ही केवळ संस्था न राहता कलाकार आणि शासन यांच्यातील मजबूत दुवा ठरली पाहिजे, असे मत श्याम लोंढे यांनी व्यक्त केले. यासाठी नाशिकसारख्या मोठ्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरात किमान दोन किंवा त्याहून अधिक नाट्यपरिषदेच्या शाखा असणे अत्यावश्यक आहे.विविध भागांतील कलाकारांना एकत्र आणणे, त्यांचे प्रश्न मांडणे, नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि वृद्ध कलाकारांना न्याय मिळवून देणे, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नाट्यपरिषदेला अधिक व्यापक आणि विकेंद्रीत स्वरूप द्यावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील काळात अपेक्षा

नाशिकमध्ये वाढणाऱ्या सांस्कृतिक चळवळी, नाटक, संगीत, चित्रपट आणि लोककलेचे कार्यक्रम पाहता येत्या काळात नाट्यपरिषदेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. योग्य नियोजन, पारदर्शकता आणि कलाकार-केंद्रित धोरण राबविल्यास नाशिक पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर अग्रस्थानी येईल, असा विश्वास श्याम लोंढे यांनी व्यक्त केला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] नाशिकमध्ये नाट्यपरिषदेच्या किमान दो… […]

Don`t copy text!