नाशिकमधील राजकारणाचा अस्वस्थ करणारा आरसा
इन्कामिंगची गर्दी, कार्यकर्त्यांची उपेक्षा आणि उद्याचा प्रश्न

अभय ओझरकर
नाशिकच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच शब्द सातत्याने ऐकू येतो— “इन्कामिंग”. विशेषतः भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणावर होत असलेली ही घडामोड अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. विचारधारेवर उभा राहिलेला, शिस्त आणि निष्ठेचा अभिमान बाळगणारा पक्ष आज केवळ सत्तेसाठीच चालला आहे का, असा सवाल आता खुलेपणाने विचारला जात आहे. गेली अनेक दशके प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे या बदलत्या राजकारणात नेमके स्थान काय, हा प्रश्न नाशिकमध्ये गंभीरपणे चर्चिला जात आहे.
भारतीय जनता पक्षाची ओळख ही नेहमीच विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून राहिली आहे. संघटन, शिस्त, कार्यकर्त्यांचे योगदान आणि तळागाळातील संपर्क ही या पक्षाची खरी ताकद मानली जाते. मात्र सध्या नाशिकमध्ये दिसणारे चित्र या ओळखीशी विसंगत वाटत आहे. मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांमधून नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत जे भाजपवर टीका करत होते, जे भाजपच्या विचारधारेच्या विरोधात उभे होते, तेच आज पक्षात सन्मानाने सामील होताना दिसत आहेत. हे चित्र पाहून सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे.
या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो— इतक्या मोठ्या प्रमाणावर इन्कामिंग सुरू असताना, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे का? की निवडणूक जिंकण्याच्या गणितात त्यांना पुन्हा एकदा गृहीत धरले जाणार आहे? सत्तेच्या आकडेमोडीत कार्यकर्त्यांच्या भावना, त्याग आणि निष्ठेला काहीच किंमत उरलेली नाही का?
नाशिकच्या राजकारणात सध्या जळगाववरून आलेले, पण नाशिकची धुरा सांभाळणारे मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका केंद्रस्थानी आहे. अधिकृत पालकमंत्री नसले तरी नाशिकमधील अनेक निर्णयांमध्ये त्यांचा प्रभाव दिसतो. “संकटमोचक” अशी त्यांची प्रतिमा आहे. अनेकदा अडचणीत सापडलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मदतीचा हात देणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र आज नाशिकमध्ये निर्माण झालेला कार्यकर्त्यांचा असंतोष हेही एक मोठे संकट आहे, याची जाणीव त्यांना आहे का, असा सवाल विचारला जात आहे.
जर हीच भरती अशीच सुरू राहिली, आणि जुने कार्यकर्ते सातत्याने डावलले गेले, तर उद्या पक्षांतर्गत उठाव होणार नाही याची खात्री कोण देऊ शकतो? कार्यकर्ते हे केवळ गर्दी जमवण्यासाठी, पोस्टर लावण्यासाठी, सतरंज्या उचलण्यासाठी नसतात. निवडणुकीत उमेदवाराच्या विजयामागे त्यांची घाम गाळलेली मेहनत असते. ही मेहनत जर सातत्याने दुर्लक्षित झाली, तर त्याचा उद्रेक होणे अटळ आहे.
या सगळ्या घडामोडींना भावनिक किनार मिळाली ती नाशिकमधील तीन वेळा आमदार राहिलेल्या देवयानी फरांदे यांच्या कालच्या मुलाखतीमुळे. माध्यमांशी बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. हा प्रसंग केवळ एका नेत्याचा भावनिक क्षण नव्हता, तर तो नाशिकमधील असंख्य कार्यकर्त्यांच्या मनातील वेदनेचे प्रतिबिंब होता.नाशिक महानगरपालिकेचे पहिले महापौर कै. शांताराम बापू वावरे असतांना त्यावेळी महापालिकेत सक्रिय असलेले प्रा. सुहास फरांदे यांच्या कुटुंबाचा राजकीय आणि सामाजिक वारसा सर्वश्रुत आहे. त्या पार्श्वभूमीवर देवयानी फरांदे यांनी नाशिककरांच्या सुख-दुःखात कायमच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांच्या डोळ्यांतून आलेले अश्रू हे जाणीवशून्य राजकारणाचे प्रतीक नाहीत का? जेव्हा एक अनुभवी, तळागाळाशी जोडलेली लोकप्रतिनिधी अशा प्रकारे भावुक होते, तेव्हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा राहत नाही, तर संपूर्ण संघटनेचा होतो. “वर सर्व काही सेटल होते, पण खाली कार्यकर्ते भरडले जातात” ही भावना आज केवळ कार्यकर्त्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सामान्य नागरिकही हा प्रश्न विचारू लागला आहे.
आज नाशिकमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, फुग्यात प्रमाणापेक्षा जास्त हवा भरली की तो फुटतो. इन्कामिंगच्या अतिरेकामुळे पक्षातील अंतर्गत समतोल बिघडत चालला आहे. अजून महापालिका निवडणुकीची तिकीटे जाहीर झालेली नाहीत. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आशेने बसले आहेत. मात्र त्याच वेळी बाहेरून येणाऱ्यांसाठी रेड कार्पेट अंथरले जात असल्याची भावना आहे. विचारधारेवर जगणाऱ्या, पक्षासाठी आयुष्य घालवलेल्या कार्यकर्त्याला डावलून नव्याने आलेल्या व्यक्तीला तिकीट देणे, आणि त्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी पुन्हा त्याच जुन्या कार्यकर्त्यांनी राबणे— हा न्याय कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
राजकारणात बदल हा सृष्टीचा नियम आहे, हे नाकारता येत नाही. पक्ष वाढवण्यासाठी नवीन चेहरे येणे आवश्यक असते. मात्र हा बदल करताना समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. जुने आणि नवे, दोघांनाही सोबत घेऊन चालणे हेच यशस्वी नेतृत्वाचे लक्षण असते. जर पक्षात सर्वच जण नेते झाले, तर शेवटी संघटना चालवणारा कार्यकर्ता कुठे राहणार? सतरंजी उचलायला, सभा यशस्वी करायला, बूथ सांभाळायला, मतदारांपर्यंत पोहोचायला शेवटी कार्यकर्ताच लागतो.
आज कार्यकर्त्यांमध्ये ही जाणीव अधिक तीव्र होत चालली आहे की, आपण केवळ वापरून घेतले जात आहोत. ही जाणीव जर अधिक खोलवर रुजली, तर ती मोठ्या क्रांतीचे रूप घेऊ शकते. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत “कार्यकर्ता त्यांच्या कामावर निवडून येईल” अशी मानसिकता तयार होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. सत्तेत येण्यासाठी ‘इन’ झालेले उद्या ‘आऊट’ करण्याची ताकद केवळ कार्यकर्त्यांमध्येच असते, हे सर्वच पक्षश्रेष्ठींनी लक्षात ठेवण्याची गरज आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनी ही बाब गांभीर्याने घेणे अत्यंत आवश्यक आहे. संकटमोचक म्हणून ओळख असली तरी, कार्यकर्त्यांमधील असंतोष हे संकट वेळेत ओळखून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा उद्या हेच संकट अधिक मोठे होऊन पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते.
भाजपामधील जुने निष्ठावंत सहकारी आणि त्यांची पुढची पिढी नेमकी कुठे हरवली आहे?
नाशिकमध्ये भाजपाची मुळे खोलवर रुजवणारे कार्यकर्ते आज कुठे आहेत, आणि त्यांच्या कुटुंबीयांचे काय झाले ?
स्व. बंडोपंत जोशी यांनी आयुष्यभर पक्षासाठी झटूनही आज त्यांच्या कुटुंबीयांना निवड प्रक्रियेत स्थान का नाही?
देवदत्त बंडोपंत जोशींना कोणता न्याय मिळाला?
दत्ता डोंगरे यांच्या पुढील पिढीचं काय?
आ. निशिगंधा मोगल, राजाभाऊ मोगल आज कुठे आहेत?
भगूरचे एकनाथ शेटे, ज्यांनी विश्व हिंदू परिषदेचं काम प्रामाणिकपणे केलं, त्यांच्या कुटुंबियांना पक्षाने काय दिलं?
दिवंगत आमदार भिकचंद दोंदे ,गणपतराव काठे,नाना वडनगरे यांच्या पुढच्या पिढीचे काय ?
रामभाऊ जानोरकर यांच्या कुटुंबीयांचं काय?भाजपासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे अरुण शेंदुर्णीकर—एकदा स्वीकृत नगरसेवक केलं, मग विसरून गेलात का? त्यांच्या आणि त्यांच्या पुढील पिढीचं काय?
सतीश शुक्ल, सुजाता करजगीकर, दिनेश राऊत, नितीन क्षीरसागर, पुष्पाताई शर्मा, स्नेहा खांदवे, बापू सिनकर, गेहेलोद, राजाभाऊ गुजराथी, केशव आव्हाड, राजेंद्र महाले,
कै. मयूर सराफ यांचे कुटुंबीय, राहुल निर्भवणे, पराग वाडिले ,नितीन वानखेडे ,संतोष ओझरकर,राजेंद्र ओढेकर —अशी असंख्य नावं आहेत, असंख्य कुटुंबं आहेत.
सत्ता येते आणि जाते.
नाशिक महानगरपालिकेचे प्रथम महापौर कै. शांताराम बापू वावरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या त्या महापालिकेत भाजपचे कै. बंडोपंत जोशी, लक्ष्मण सावजी आणि सुहास फरांदे यांनी ज्या पद्धतीने काम केलं, त्या सुवर्णकाळाचा मी स्वतः साक्षीदार आहे.लक्ष्मण सावजी यांना प्रदेश कार्यकारिणीवर पाठवण्यात आलं, हे योग्यच होतं. मात्र नाशिकमध्ये प्रत्यक्ष मैदानात लढणाऱ्या या प्रामाणिक भाजप कार्यकर्त्याने स्वतःसाठी कधीच काही अपेक्षा ठेवल्या नाहीत. तरीसुद्धा, त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्या पुढील पिढीला संधी देण्याचं काम झालं पाहिजे—हीच रास्त आणि नैतिक अपेक्षा आहे.
ज्यांनी पक्षाचा पाया रचला, ज्यांनी संघर्षात भाजपाला उभं केलं, त्यांना विसरायचं नाही.निष्ठावंतांची उपेक्षा आणि त्यागाची अवहेलना हा भाजपाचा संस्कार नाही—असता कामा नये.हा इशारा नाही, हा आठवणीचा ठोस सवाल आहे.पाया घालणाऱ्यांना विसराल, तर इमारत टिकणार नाही. अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
कार्यकर्त्यांना न्याय मिळावा— मग तो कोणत्याही पक्षाचा असो. कार्यकर्ता हा केवळ गर्दी जमवणारा किंवा सतरंजी उचलणारा नसून, तोच पक्षाचा खरा कणा आहे, ही जाणीव जर नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना दोघांनाही झाली, तरच खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल घडू शकतो. अन्यथा, “लवकरच कार्यकर्त्यांचा दिवस येणार” ही चर्चा केवळ चर्चा न राहता वास्तवात उतरण्यास वेळ लागणार नाही.
नाशिकचे ज्येष्ठ रंगकर्मी कैलास पाटील यांची कविता
कार्यकर्ता.तो धावत राहिला—नेत्याच्या खुर्च्या वेळेवर पोहोचाव्यात म्हणून,सभेआधी मैदान पुसत राहिला,गर्दी जमवण्यासाठीस्वतःचा आवाज झिजवत राहिला,सतरंज्यांखालीस्वतःचं आयुष्य गुंडाळत राहिला,हार–तुर्यांतनेत्याची उंची वाढवत राहिला.नेत्याने मात्रसोयीप्रमाणे पक्ष बदलले,विचार बदलले,नावे बदलली—फक्त कार्यकर्त्यानेस्वार्थ मात्रकधीच बदलला नाही.हा मात्रजुन्याच झेंड्याखाली उभा राहिला,निष्ठेचा गळ्यात दोर घालूनअभिमानाने फिरत राहिला—सच्चा कार्यकर्ता म्हणून!आज अखेरत्याच्या नशिबी आलाहार, गुच्छ…आणि चार शब्दांची भाषणं.सर्वत्र गुणगान—कारणतो आता उपयोगाचा नव्हता.त्याला तिरडीवर ठेवतांनापंचक्रोशी शोधत होतीनेत्याचा चेहरा—नेता मात्रनेहमीप्रमाणे व्यस्तच होतालोकशाही वाचवण्यात,पक्ष फुगवण्यात,नवे कार्यकर्ते घडवण्यात…एक कार्यकर्ता गेला—पक्ष मात्रनेहमीप्रमाणेजिवंतच राहिला!

