पुणेकरांना मेट्रो-बस प्रवास मोफत, राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात ‘गेमचेंजर’ आश्वासन

अजितदादांची लाडकी बहीण योजनेला मागे टाकणारी घोषणा

0

पुणे | दि. १० जानेवारी २०२६NCP Joint Manifesto पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा संयुक्त जाहीरनामा आज पुण्यात जाहीर करण्यात आला. या जाहीरनाम्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुणेकरांसाठी एक अत्यंत धाडसी आणि ‘गेमचेंजर’ ठरणारी घोषणा केली आहे. पुणे शहरातील सर्व नागरिकांसाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल बस प्रवास पूर्णतः मोफत करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

अजित पवार म्हणाले की, सध्या पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे पुणेकरांचे दररोज सुमारे साडे सात कोटी रुपये पेट्रोलवर खर्च होतात. हा खर्च वार्षिक हिशोबाने तब्बल १०,८०० कोटी रुपयांपर्यंत जातो. “हेच पैसे जर सार्वजनिक वाहतुकीवर खर्च झाले, तर पुणेकरांना मोफत प्रवास देता येईल आणि शहराची वाहतूक व्यवस्था आमूलाग्र बदलता येईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोफत मेट्रो आणि बस सेवा सुरू झाल्यास खासगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होईल, परिणामी वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषणावर नियंत्रण मिळेल आणि पुणे शहर प्रदूषणमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा दावा अजित पवार यांनी केला. “अनेक तज्ज्ञांशी चर्चा करूनच मी ही घोषणा करत आहे. महापालिका आमच्या ताब्यात आली, तर हे आश्वासन प्रत्यक्षात उतरवून दाखवीन,” असे आव्हानात्मक विधान त्यांनी केले.

‘आम्ही पुणेकर, पुण्याची काळजी आम्हालाच’

आम्ही पुण्यात राहतो, पुणेकरांशी आमचा जिव्हाळा आहे. बाहेरचे लोक इथे फक्त निवडणुकीपुरते येतात. त्यामुळे पुण्याच्या विकासासाठी आम्हालाच संधी द्या,” असे आवाहन अजित पवार यांनी पुणेकरांना केले.

💧 पाणीपुरवठा : टँकरमुक्त पुण्याचा संकल्प (NCP Joint Manifesto)

संयुक्त जाहीरनाम्यात पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर आणि ठोस आश्वासने देण्यात आली आहेत. पीएमसीच्या सर्व ४१ प्रभागांमध्ये दररोज उच्च दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. यामुळे उंच भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळण्याची समस्या आणि टँकरवरचे अवलंबित्व पूर्णपणे संपेल, असा दावा करण्यात आला आहे.पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक काही महिने आधीच जाहीर केले जाईल आणि ते काटेकोरपणे पाळले जाईल. वेळापत्रकात बदल झाल्यास किमान दोन दिवस आधी एसएमएस आणि सोसायटी सूचना फलकावर माहिती देणे बंधनकारक असेल.यासोबतच टँकर माफियांचे १०० टक्के उच्चाटन करण्याचा निर्धार जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. पीएमसीच्या वेबसाईटवर टँकर फेऱ्यांचा सार्वजनिक डेटाबेस उपलब्ध करून पारदर्शकता राखली जाईल.

🚦 वाहतूक, रस्ते आणि कनेक्टिव्हिटी

पुणे शहरातील ३३ मिसिंग लिंक आणि १५ प्रमुख रस्त्यांचे दर्जेदार काम करण्यात येणार आहे. पुढील दोन वर्षांत बाणेर-पाषाण लिंक रोड, कात्रज-कोंढवा रोड, वाघोली-लोहगाव लिंक रोड यांसह अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ३६ किमीचा HCMTR (इंटरनल रिंग रोड) हा प्रकल्प पुण्याच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

🏥 आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा

पुणे महानगरपालिका क्षेत्रात २०० ‘राजमाता जिजाऊ क्लिनिक’ उभारण्यात येणार असून येथे मोफत तपासणी आणि औषधे दिली जातील. वाघोली, हडपसर, वारजे आणि कोंढवा परिसरात नवीन रुग्णालये उभारून एकूण २,८०० बेडची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह मोफत टॅब्लेट, तर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

🏠 मध्यमवर्गाला दिलासा

१ एप्रिल २०२६ पासून ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर पूर्णपणे माफ केला जाणार आहे. यामुळे मध्यमवर्गीय, ज्येष्ठ नागरिक आणि लहान घरमालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

🌱 स्वच्छ, हरित आणि सुरक्षित पुण्याचा संकल्प

२०२९ पर्यंत पुणे शहर स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या तीन शहरांत आणण्याचे लक्ष्य जाहीरनाम्यात नमूद आहे. ग्रीन सोसायट्यांना मालमत्ता करात २० टक्के सवलत, सौरऊर्जा, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक विकासावर भर देण्यात येणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!