लोकशाहीचा कौल की सत्तेची मक्तेदारी? मतदार ठरवणार !

कोलांटी उडी मारणाऱ्यांना जनता धडा शिकवणार का?

1

अभय ओझरकर 

(Maharashtra Municipal Elections 2026) लोकशाही हा केवळ मतदानाचा सोहळा नसून तो जनतेच्या आशा-आकांक्षांचा, अपेक्षांचा आणि भविष्यासाठीच्या स्वप्नांचा आरसा असतो. आज महाराष्ट्रासह नाशिक शहरात जी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, ती केवळ महानगरपालिकेपुरती मर्यादित नसून ती २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून पाहिली जात आहे. म्हणूनच या निवडणुकीकडे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हणून पाहणे ही मोठी चूक ठरेल.आज “मतदारांनो जागे व्हा” असा सूर केवळ राजकीय कार्यकर्त्यांकडून नव्हे, तर ज्येष्ठ नागरिक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य कष्टकरी जनता यांच्याकडून व्यक्त होत आहे. अनेक वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीकडून लोकांना प्रचंड अपेक्षा आहेत. पण या अपेक्षांना राजकीय वास्तव कितपत न्याय देत आहे, हा खरा प्रश्न आहे.

विकासाचे मुद्दे बाजूला, फूट पाडणाऱ्या राजकारणाचा उदय (Maharashtra Municipal Elections 2026)

नाशिक असो वा संपूर्ण महाराष्ट्रनिवडणुकीच्या प्रचारात शहराचा विकास, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण, रोजगार यांसारखे मूलभूत मुद्दे मागे पडलेले दिसतात. त्याऐवजी “तोडा-फोडा आणि राज्य करा” ही नीती पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे.समाजामध्ये तेढ निर्माण करणारे मुद्दे, धार्मिक-सामाजिक ध्रुवीकरण, भावनिक घोषणांचा माराया सगळ्यामुळे मतदार गोंधळलेला आहे. प्रश्न असा आहे की, या भांडणांतून शहराचा विकास होणार आहे का? की पुन्हा एकदा विकासाच्या नावावर आश्वासनांची पोकळीच उरते?

तिकीट वाटपातील गोंधळ आणि सत्तेसाठीची कोलांटी उडी

या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे तिकीट वाटप. अनेक पक्षांमध्ये प्रामाणिक, वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते डावलले गेले आणि अचानक “आयात केलेले” उमेदवार पुढे आणले गेले.सत्तेची लालसा इतकी वाढली आहे की पक्ष बदलणे, कोलांटी उडी मारणे हे जणू सामान्य झाले आहे.या प्रक्रियेत एक विचित्र चित्र समोर आलेसत्तेच्या जवळ जाण्यासाठी पक्ष बदलणारे नेतेआणि अन्याय सहन न करता अपक्ष किंवा विरोधी पक्षातून निवडणूक लढवणारे प्रामाणिक उमेदवारयामुळे सामान्य मतदार संभ्रमात आहे. प्रश्न असा आहे की, निष्ठा महत्त्वाची की सत्ता? आणि मतदाराने नेमका कोणावर विश्वास ठेवायचा?

पैसे वाटप, व्हायरल व्हिडिओ आणि लोकशाहीची शोकांतिका

या निवडणुकीत अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे दृश्य महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेसाठी अत्यंत चिंताजनक आहे.याहूनही धक्कादायक बाब म्हणजे६५ पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून येणे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असे चित्र क्वचितच पाहायला मिळाले आहे.बिनविरोध निवडणूक म्हणजे लोकशाहीचा विजय नसून, अनेक ठिकाणी तो मतदारांच्या असंतोषाचा, दबावाचा किंवा पर्याय नसल्याचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. अनेक मतदारांच्या मनात प्रश्न आहे—“आम्हाला मतदानाची संधीच का मिळाली नाही?”

हिंदुत्व, युती आणि राजकीय विरोधाभास

हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि हिंदुविरोधी म्हणून ठरवल्या गेलेल्या पक्षातील (अकोट नगरपालिकेत)युतीचा मुद्दा विरोधकांनी आक्रमकपणे उचलून धरला.एका बाजूला वैचारिक शुद्धतेची भाषा, तर दुसऱ्या बाजूला सत्तेसाठीचे तडजोडीचे राजकारणया विरोधाभासामुळे सामान्य कार्यकर्ते आणि मतदार अस्वस्थ आहेत.हे चित्र केवळ एका पक्षापुरते मर्यादित नाही. अनेक पक्षांनी सत्तेच्या गणितासाठी तडजोडी केल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. पण यात भरडला जातो तो प्रामाणिक कार्यकर्ता.

ठाकरे बंधू एकत्र : भावनिक लाट आणि वास्तव

२० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यभरात, विशेषतः मराठी माणसामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. त्यांच्या संयुक्त सभेला मोठी गर्दी झाली.सोशल मीडियावर “मराठी माणूस सुखावला” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात दिसून आल्या.पण निवडणूक ही केवळ भावना नाही; ती भविष्यासाठीचा निर्णय आहे. त्यामुळे प्रश्न उरतोमतदार भावनेपोटी मतदान करणार की विचारपूर्वक?१६ तारखेला हे स्पष्ट होणार आहे की, मतदार घरात लक्ष्मीपूजन करणार की सत्तापिपासू उमेदवारांना कौल देणार.

महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांची कोंडी(Maharashtra Municipal Elections 2026)

आजचा सर्वसामान्य मतदार रोटी-कपडा-मकान याच चक्रात अडकलेला आहे. वाढती महागाई, रोजगाराची अनिश्चितता, शिक्षण-आरोग्याचा खर्चया सगळ्यामुळे कष्टकरी जनता फक्त “आजची चूल कशी पेटेल” याच विचारात आहे.अशा परिस्थितीत निवडणुकीपुरते पैसे, भेटवस्तू किंवा आश्वासनांच्या भूलथापा मतदार स्वीकारेल का?अनेक नागरिकांचे मत आहे की, गेल्या अनेक वर्षांत मिळालेल्या फसव्या आश्वासनांची सल आता मतदारांच्या मनात खोलवर बसली आहे.

कोलांटी उडी मारणाऱ्यांना जनता धडा शिकवणार का?

स्पष्ट बोलणारे कमी असले, तरी राजकीय विश्लेषकांच्या चर्चेत एक प्रश्न सातत्याने उपस्थित राहतो आहेस्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या, सत्तेसाठी काहीही करणाऱ्या उमेदवारांना जनता या मतदानातून धडा शिकवेल का?लोकशाहीत मतदान हा केवळ हक्क नाही, तर जबाबदारी आहे. चुकीच्या निर्णयाची किंमत पुढील पाच वर्षे शहराला आणि पुढील पिढीला मोजावी लागते.

कुंभमेळा, पर्यावरण आणि दडपलेला जनआवाज

नाशिकमध्ये येणारा कुंभमेळा हा धार्मिक-सांस्कृतिक सोहळा असला, तरी त्याच्या नावाखाली वृक्षतोड  आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून अनेक संस्था, कलाकार आणि सामान्य नागरिक एकत्र आले आहेत.परंतु सर्वसामान्यांचा आवाज दाबून जर सत्ताधारी आपलेच निर्णय पुढे रेटत असतील, तर जनता त्यांना काय उत्तर देणारहे देखील १६ तारखेला स्पष्ट होणार आहे.

जनस्थान ऑनलाईनचा प्रयत्न

जनस्थान ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या भावना, प्रश्न आणि अपेक्षा मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. हा लेख कोणत्याही पक्षाच्या बाजूने नसून, लोकशाहीच्या बाजूने आहे.

विचारपूर्वक मतदानाचा निर्धार

विविध मोफत योजनांच्या नावाखाली तुम्हाला परावलंबी आणि गरीब ठरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता निवडणुकीच्या काळात पैशांच्या पाकिटांनी तुम्हाला भिकारी ठरवले जाणार आहे. इतक्या टोकाच्या अधःपतनाला बळी पडू नका. कारण हे वाटप केलेले पैसे कुठून येतात, हे समजून घ्यायाच पैशांची भरपाई तुमच्याकडूनच कररूपाने वसूल केली जाते. हे वास्तव न समजणे म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अपमान करून घेण्यासारखे आहे.विविध पक्षांचे उमेदवार विकास आणि धर्माचे मुखवटे घालून जनतेसमोर येतात, पण त्या मुखवट्यांआड त्यांचे खरे चेहरे लपलेले असतात. ते ओळखण्याइतके शहाणपण आणि सजगता अंगी बाळगा. हे बुरखे थेट फाडता येत नसले, तरी तुमच्या विचारपूर्वक, निर्भय आणि प्रामाणिक मतदानाने ते नक्कीच उसवता येतील. असे मतदान केवळ तुमचे भविष्य घडवत नाही, तर आपल्या लोकशाहीवर केलेले मोठे उपकार ठरते

शेवटचा प्रश्न : विकास की भौतिक सुख?

मतदारांनो, प्रश्न साधा आहे

आपल्याला विकास हवा आहे की क्षणिक भौतिक सुख?प्रशासकीय यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहे. पण योग्य लोकप्रतिनिधी नसतील, तर ती मेहनत अपुरी ठरते.तुमचे एक मत केवळ आजचा निकाल ठरवत नाही; ते तुमच्या पुढील पिढीचे भविष्य घडवते. त्यामुळे जवळचा स्वार्थ न पाहता, दूरदृष्टी ठेवून, निर्भीडपणे मतदान करा.कारण जागा झालेला मतदारच लोकशाही वाचवू शकतो.मतदारांनो जागे व्हा… वेळ अजून गेलेली नाही.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] अडीच वर्षांच्या महापौरपदावर शिवसेनेचाच (शिंदे गट) महापौर असावा, अशी भूमिका शिंदे […]

Don`t copy text!