नाशिकच्या सांस्कृतिक चळवळीचे शिल्पकार वासुदेव दशपुत्रे यांचे निधन

नाशिकच्या सांस्कृतिक विश्वातील दीपस्तंभ हरपला

1

नाशिक, दि २१ जानेवारी २०२६- Vasudev Dashputre passes away  नाशिकच्या जुन्या काळातील सांस्कृतिक क्षेत्राची जडणघडण करणारे, नाट्य–संगीत–साहित्य क्षेत्रातील अनेक संस्थांचे आधारस्तंभ आणि नाशिक शहर सांस्कृतिक महामंडळाचे संस्थापक श्री. वासुदेव उर्फ सर्वांचे ‘नाना’ दशपुत्रे यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने नाशिकच्या सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे.

नाशिकमधील सांस्कृतिक क्षेत्राला संघटित स्वरूप देण्यासाठी दशपुत्रे यांनी नाशिक शहर सांस्कृतिक महामंडळ या मध्यवर्ती संस्थेची स्थापना करून तिची उभारणी केली. या महामंडळाच्या माध्यमातून नाट्य, संगीत, साहित्य, लोककला अशा विविध क्षेत्रातील संस्थांना एकत्र आणत त्यांनी अनेक नवोदित व ज्येष्ठ कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे नाशिकमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात निकोप मैत्रीभाव, सहकार्य आणि सर्जनशील वातावरण निर्माण झाले.उत्तम संघटक, कुशल आयोजक आणि मार्गदर्शक म्हणून दशपुत्रे यांचे कार्य नाशिकच्या सांस्कृतिक जडणघडणीत अत्यंत मोलाचे ठरले. त्यांनी देश-विदेशातील कलाकार नाशिकमध्ये आणून दर्जेदार कार्यक्रम घडवून आणले.

विशेष म्हणजे त्यांनी रशियन कलावंतांचे कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित करून शहराच्या सांस्कृतिक विश्वाला आंतरराष्ट्रीय पातळीची ओळख करून दिली.सांस्कृतिक कार्यासोबतच त्यांनी स्वतःही अनेक नाट्यप्रयोगांमध्ये भूमिका साकारल्या. नोकरीनिमित्ताने त्यांनी आयुर्विमा महामंडळात (LIC) एक कर्तबगार अधिकारी म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आणि प्रशासकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला.अतिशय धडाडीचे, हसतमुख, सदैव इतरांना प्रेरणा देणारे आणि कोणत्याही अडचणीवर मात कशी करायची हे शिकवणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ असंख्य कलाकार, संस्था व कार्यकर्त्यांनी घेतला.त्यांच्या पश्चात दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर आज दुपारी ४ वाजता नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.श्री. वासुदेव उर्फ नाना दशपुत्रे यांच्या निधनाने नाशिकने एक दूरदर्शी मार्गदर्शक, संवेदनशील संघटक आणि खरा सांस्कृतिक शिल्पकार गमावला आहे.

प्रतिक्रिया

नाशिकच्या सांस्कृतिक विश्वातील चैतन्य हरपले – दिलीप फडके (Vasudev Dashputre passes away)

कै. वासुदेव दशपुत्रे (नाना) यांच्या निधनामुळे नाशिकच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात अपूरणीय अशी पोकळी निर्माण झाली आहे. चैतन्याने सळसणारे, नेहमी हसतमुख आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेले असे नानांचे व्यक्तिमत्व सर्वांनाच प्रेरणा देणारे होते. सांस्कृतिक उपक्रम, वाचन चळवळ, कार्यक्रमांचे आयोजन आणि नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर सातत्याने योगदान दिले.नानांचे विचार, त्यांची कार्यतत्परता आणि माणुसकीची ओढ ही नाशिकच्या सांस्कृतिक विश्वासाठी दिशादर्शक ठरली. सार्वजनिक वाचनालय, विविध कला-संस्कृती मंच आणि सामाजिक संस्थांशी त्यांचे अतूट नाते होते. कुठल्याही उपक्रमासाठी ते नेहमी पुढाकार घेऊन उभे राहत.त्यांचे जाणे ही केवळ एका व्यक्तीची नाही तर एका चालत्या-बोलत्या संस्कृतीची हानी आहे. नानांच्या स्मृती, त्यांचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणादायी राहतील. कै. वासुदेव दशपुत्रे यांना भावपूर्ण आदरांजली.—

दिलीप फडकेअध्यक्ष, (सार्वजनिक वाचनालय, नाशिक)

नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा भावनिक आधार हरपला –  नरेश महाजन (Vasudev Dashputre passes away)
नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी नाना दशपुत्रे यांचे जाणे म्हणजे अनेकांचा भावनिक आधारच हरपणे आहे. त्यांच्याशी होणारा संवाद हा केवळ बोलणं नसायचं, तर तो जगण्याची नवी उमेद देणारा, प्रेरणादायी आणि सुखद प्रवास असायचा.व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला, तरीही नाना दशपुत्रे यांनी कधीही रडत-खुडत आयुष्य जगले नाही. चैतन्य, हसतमुखपणा आणि अखंड उत्साह हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती. कोणत्याही परिस्थितीत सकारात्मकतेने पुढे जाण्याची ताकद त्यांनी आपल्या वागण्यातून नेहमीच दाखवून दिली.त्यांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे म्हणजे एक आनंदाचा सोहळाच असे. समोरच्या व्यक्तीला आपलंसं करून घेणं, तिच्यातील आत्मविश्वास जागवणं ही त्यांची खासियत होती.नाना दशपुत्रे यांच्या जाण्याने नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचे, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व कायमचे दुरावले आहे. ही पोकळी सहज भरून न निघणारी आहे.— नरेश महाजन

नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासातील उज्वल व्यक्तिमत्व – लक्ष्मण सावजी
नाशिक शहरातील समृद्ध आणि गौरवशाली सांस्कृतिक विश्वाच्या इतिहासात आपले अढळ स्थान निर्माण करणारे इतिहासपुरुष श्रीमंत वासुदेवराव दशपुत्रे यांच्या दुःखद निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. सांस्कृतिक चळवळीला दिशा देणारे, परंपरा जपतानाच नव्या विचारांना प्रोत्साहन देणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व नाशिकसाठी प्रेरणादायी होते.
साहित्य, कला, नाट्य, संगीत आणि वाचन संस्कृती यांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी आयुष्यभर अखंडपणे कार्य केले. अनेक संस्था, उपक्रम आणि कलाकारांना त्यांनी उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नाशिकची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध झाली.
त्यांचे विचार, कार्य आणि संस्कृतीप्रेम सदैव स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

एक अवलिया व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड– रवींद्र ढवळे
वासुदेव ज. दशपुत्रे या नावाचे लेटरहेड छापणारे आमचे नाना म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रेट व्यक्तिमत्त्व होते. इंडो–रशिया सांस्कृतिक देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्या काळात नाशिककर प्रेमाने त्यांना ‘वासुलान्स्की दशपुताव’ म्हणत असत, हेच त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आहे.
नाशिकमधील विविध संस्थांना एकत्र बांधून त्यांचे महामंडळ उभे करणारा हा दूरदृष्टीचा माणूस आज आपल्यातून निघून गेला, याचे मनापासून दुःख वाटते. समाज, संस्कृती आणि माणसांना जोडणारा असा अवलिया क्वचितच जन्माला येतो.
नानांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांचे विचार आणि कार्य सदैव स्मरणात राहील

नाना दशपुत्रे : नाशिकच्या सांस्कृतिक विश्वाला उजाळा देणारे कलासक्त कलंदर  – केलास पाटील
नाना दशपुत्रे म्हणजे नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक जिवंत चैतन्य होते. नाशिक शहर सांस्कृतिक महामंडळाची स्थापना करून शहरातील विविध सांस्कृतिक संस्थांना एका झेंड्याखाली आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. परस्परांतील मतभेद विसरून सौहार्द, संवाद आणि सहकार्याची संस्कृती निर्माण करणारा असा हा अवलिया व्यक्तिमत्त्व होता.स्वतः उत्तम व्हायोलिन वादक असल्यामुळे संगीताची उपजत जाण, रसिकता आणि शिस्त त्यांच्या प्रत्येक उपक्रमात दिसून येत असे. महामंडळात त्यांच्या सोबत सचिव म्हणून काम करताना अनुभवलेला त्यांचा मिश्किल स्वभाव, नर्मविनोद आणि आपुलकी आज केवळ आठवणींच्या रूपाने उरला आहे.
नाशिक जिल्हा सांस्कृतिक संघटना उभारणीत त्यांचा वाटा मोलाचा होता. भजन, युगलगीत, सिनेगीत, एकांकिका, शास्त्रीय संगीत अशा विविध स्पर्धांद्वारे त्यांनी नाशिकचे सांस्कृतिक विश्व सदैव प्रज्ज्वलित ठेवले. अशा या सांस्कृतिक विभूतीस विनम्र प्रणाम.

कर्तव्य, संस्कृती आणि माणुसकीचा आदर्श हरपला — नंदन दीक्षित
श्री. वासुदेव दशपुत्रे (नाना) यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एलआयसीमध्ये उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत राहून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी समाजकार्याचा वसा अखंडपणे जपला. सार्वजनिक वाचनालयाचे अनेक वर्षे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी वाचनसंस्कृतीस भक्कम पाठबळ दिले. उत्तम बासरीवादन हे त्यांच्या कलासक्त व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक पैलू होते.
नाना केवळ पदांनी मोठे नव्हते, तर मनाने अत्यंत हळवे आणि मदतीस तत्पर होते. गरजूंना मदत करण्यासाठी ते नेहमी पुढे असत. विशेषतः त्यांच्या कुटुंबाविषयीची जबाबदारी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे निभावली. मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलीची काळजी, तिच्या भवितव्याची चिंता ते सतत व्यक्त करत. “माझ्यानंतर तिचं काय?” हा प्रश्न त्यांच्या मनात कायम असायचा.
कर्तव्यनिष्ठा, माणुसकी आणि संवेदनशीलतेचा असा आदर्श व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेलं, याचं दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही. नानांना भावपूर्ण श्रद्धांजली

.— नंदन दीक्षित

नाशिकच्या सांस्कृतिक विश्वाचा आधारस्तंभ हरपला; नाना दशपुत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली – प्रशांत जुन्नरे
नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ, अवलिया आणि सर्वांना आपुलकीने जोडणारे व्यक्तिमत्त्व, सार्वजनिक वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष श्री. वासुदेव दशपुत्रे (नाना) यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्याने नाशिकच्या सांस्कृतिक परिवारावर शोककळा पसरली आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते आमच्या सांस्कृतिक कुटुंबाचे आधारस्तंभ होते.
साहित्य, वाचन संस्कृती, कला आणि सामाजिक उपक्रम यांबाबत त्यांची तळमळ अखंड होती. कोणत्याही कार्यक्रमात नानांची उपस्थिती म्हणजे ऊर्जा, मार्गदर्शन आणि सकारात्मक प्रेरणा असायची. नव्या पिढीला घडवण्यासाठी ते नेहमी पुढे असत.
त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व, स्पष्ट विचार आणि संस्कृतीवरील निष्ठा कायम स्मरणात राहील. नानांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
विनम्र अभिवादन 🙏
— प्रशांत जुन्नरे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. हेमंत गव्हाणे says

    नमस्कार, जनस्थान मुळे महाराष्ट्रात कुठेही असलो तरी नाशिकची खबरबात मिळते धन्यवाद….

Don`t copy text!