“न्याय देण्यासाठी की न्याय प्रलंबित ठेवण्यासाठी आहे सर्वोच्च न्यायालय?”
शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणी पुढे ढकलल्याने खासदार अरविंद सावंतांचा संताप


नवी दिल्ली | दि. २१ जानेवारी २०२६- Maharashtra politics news शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हासंदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी अचानक पुढे ढकलण्यात आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “न्यायालय हे न्याय देण्यासाठी आहे की न्याय प्रलंबित ठेवण्यासाठी?” असा थेट सवाल करत सावंत यांनी लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार सावंत यांनी आपल्या भावना उघडपणे मांडल्या. “तारीख पर तारीख देण्याचा खेळ सुरू आहे का? हा लोकशाहीचा खेळ असेल तर संविधानातील आर्टिकल १० काढून टाकावे,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
🔹 अंतिम सुनावणी ठरूनही तारीख पुढे का ढकलली?(Maharashtra politics news)
या प्रकरणात मागील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना त्यांच्या युक्तिवादासाठी किती वेळ लागेल, याची विचारणा केली होती. दोन्ही बाजूंनी आपापली वेळ स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने २१ जानेवारी २०२६ रोजी अंतिम सुनावणी होईल, असे स्पष्टपणे सांगितले होते.
मात्र प्रत्यक्षात आज ही सुनावणी होऊ शकली नाही आणि ती आता शुक्रवारी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.
यावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले, “जेव्हा अंतिम सुनावणीची तारीख आधीच ठरवण्यात आली होती, तेव्हा आज ती पुढे ढकलण्याचे कारण काय?”
🔹 “११:३० वाजता वेळ दिली असताना आमचा क्रमांक ३७ वा कसा?”
न्यायालयाच्या कार्यसूचीवर या प्रकरणासाठी सकाळी ११:३० वाजता वेळ निश्चित असतानाही प्रत्यक्षात सुनावणीसाठी ३७ वा क्रमांक देण्यात आल्याचा आरोप सावंत यांनी केला.
“जर प्रकरण इतके महत्त्वाचे नसेल, तर आधीच स्पष्ट का सांगितले जात नाही? अशा पद्धतीने न्यायालयीन प्रक्रिया लांबवली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
🔹 निवडणुका पार पडल्या, चिन्हाचा गैरवापर सुरूच – सावंतांचा आरोप
खासदार सावंत यांनी सांगितले की, शिवसेना पक्ष व चिन्हावरील वाद प्रलंबित असतानाच महाराष्ट्रात
विधानसभा निवडणुका
नगरपालिका निवडणुका
महानगरपालिका निवडणुका
या सर्व निवडणुका पार पडल्या आहेत.
“या काळात चिन्हाचा सातत्याने गैरवापर झाला. आता जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत. न्यायालयाने जर निर्णय देणार नसेल, तर स्पष्ट सांगावे की आता संविधान आम्हाला मान्य नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“मग संविधानातील आर्टिकल १० काढून टाका आणि मोकळ्या पानाने बसा,” असे अत्यंत तीव्र वक्तव्य सावंत यांनी यावेळी केले.
🔹 मुंबई महापौर पदावरूनही घणाघात
मुंबई महानगरपालिकेतील सत्तासंघर्षावर प्रश्न विचारला असता अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर टीकेची झोड उठवली.
“युतीकडे बहुमत आहे, असे म्हणत असतील तर त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवले जाते?” असा सवाल त्यांनी केला.
“आमचे नगरसेवक मोकळेपणाने फिरत आहेत. मग तुमचे नगरसेवक मोकळे का नाहीत?” असेही ते म्हणाले.
🔹 “अमाप पैसा वाटला, तरी मशालवर लोकांनी मत दिले”
निवडणुकीदरम्यान आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आरोप करत सावंत म्हणाले,
“महापालिकेत वस्तू वाटल्या गेल्या, अमाप पैसा वाटण्यात आला. ईव्हीएम मशीनवर आमचे ‘मशाल’ चिन्ह अतिशय बारीक छापले होते. तरीसुद्धा लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केले.”
“त्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
🔹 “खरे हिंदुत्व आणि राष्ट्रत्व उद्धव ठाकरे यांच्याकडेच”
आपल्या भाषणाचा शेवट करताना सावंत यांनी ठामपणे सांगितले की,
“खरे हिंदुत्व आणि खरे राष्ट्रत्व हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. शिवसेनेची मूळ विचारसरणी, तिचा आत्मा आणि तिची ओळख आजही उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली जिवंत आहे.”

