नाशिक – नाशिक महिला क्रिकेट साठी अजुन एक आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन च्या ईश्वरी सावकार ची १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफी साठी निवड झाली आहे. नुकतीच ईश्वरी सावकार ची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झालेली आहे. १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफी चे सामने जयपुर येथे २५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान होणार असून त्याकरिता ही निवड झाली आहे.
नुकत्याच सुरत येथे झालेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राज्यस्तरीय महिला ५० षटकांच्या एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा पार पडली. ह्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेळाडूंची चॅलेंजर ट्रॉफी साठी साठी निवड होत असते. सदर स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघातर्फे सलामीवीर म्हणुन खेळताना ईश्वरी सावकार ने फलंदाजीचे जोरदार प्रदर्शन केले. आंध्र विरूद्ध ८६ तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज ७३ धावा केल्या. ह्या कामगिरीच्या जोरावरच ईश्वरी सावकार ची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघापाठोपाठ आता १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफी साठी देखील निवड झाली आहे. ईश्वरी सध्या महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघा बरोबर अहमदाबाद येथे सराव करत असुन , आता चॅलेंजर ट्रॉफी साठी जयपुर येथे रवाना होत आहे.
या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून, सदर निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी ईश्वरी सावकार चे अभिनंदन करून भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.