नाशिक – उत्तम पुस्तके वाचनालयाच्या कपाटात न राहता ती वाचकांपर्यंत पोहचली पाहिजे. वाचकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्याच्यापर्यंत पुस्तके घेऊन गेल्यास वाचन संस्कृती वाढीला लागेल. तंत्रज्ञानाने रंजनाची साधने आपल्या हातात आली आहेत. तरीसुद्धा ग्रंथ हातात घेऊन वाचणारे वाचक आहेत. त्यांच्या वाचनाच्या आवडीनिवडी आहेत. ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे पुढचे पाऊल असलेल्या माय बुक बास्केट या उपक्रमातून वाचकांना त्यांच्या आवडीचे साहित्य वाचायला मिळणार आहे. त्यामुळे हा उपक्रम ज्ञानसंवर्धन आणि वाचन अभिरुची वाढवणारा उपक्रम ठरेल, असा विश्वास ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि यशवंतराव चव्हाण वाचनालयाच्या माय बुक बास्केट या उपक्रमाला त्यांनी पंचवीस पुस्तके भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी विश्वास ठाकूर, कुटुंब प्रमुख , विश्वास ग्रुप तसेच विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी यांनी उपक्रमाची माहिती ना. भुजबळ यांना दिली. जयप्रकाश जातेगावकर, दिलीप साळवेकर, प्रा शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, अमोल जोशी हे यावेळी उपस्थित होते. तीन ते पाच डिसेंबर या तीन दिवस नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात माय बुक बास्केट या उपक्रमाची माहिती विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि यशवंतराव चव्हाण वाचनालयाकडून वाचकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमाला नाशिक महानगरात मोठा प्रतिसाद मिळत आहे.