अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी : दिवाळी ईडी कोठडीत जाणार
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची अनिल देशमुखांची दिवाळी ईडी कोठडीतच जाणार आहे.शंभर कोटी वसुलीच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीकडून अनिल देशमुख यांना पाच समन्स बजावले होते. मात्र एकदाही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. मात्र काल, सोमवारी अचानकपणे ईडी कार्यालयात देशमुख हजर झाले.त्यानंतर १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून देशमुखांना अटक करण्यात आली होती. आज देशमुखांना विशेष न्यायालया समोर हजर केलं. ६ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने देशमुखांना ईडी कोठडी सुनावली आहे.
ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले. मग अनिल देशमुखांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून काही अधिकारी मुंबईला पोहोचले.तब्बल १३ तास चौकशी केल्यानंतर काल रात्री उशिरा देशमुखांना अटक करण्यात आली. आज सकाळी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर देशमुखांना मुंबईतील सत्र न्यायालयीत सुट्टीकालीन विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आलं.
अनिल देशमुख सहाकार्य करत नसून त्यांच्याविरोधात अनेक तपशील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत असे ईडीतर्फे एएसजी अनिल सिंग यांनी युक्तीवाद करताना देशमुखांना कोठडी का गरजेची आहे, ते न्यायालयाला पटवून दिले. तसेच यापूर्वी याप्रकरणातील काही जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जी माहिती समोर आली आहे, या आधारावर पुढील तपास होणार आहे. त्यामुळे देशमुखांची कोठडी गरजेची आहे, असे मांडण्यात आले.
तसेच देशमुखांच्या वतीने जेष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयात पटवून दिले की, देशमुखांनी याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि ती याचिका न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर अजून निकाला येणे बाकी आहे. त्यामुळे कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना अशा प्रकारे तपास यंत्रणांना ताबा देणे चुकीचे ठरेल. त्यामुळे याचा विचार करावा. या वेळी देशमुखांच्या प्रकृतीचा दाखला देखील देण्यात आला. तसेच त्याचे वाढते वय हि लक्षात घ्यावे या सर्व गोष्टी मांडण्यात आल्या. परंतु न्यायालयाने तपास यंत्रणेच्या बाजूने निकाल जाहीर केला. न्यायमूर्ती पी.बी. जाधव यांनी ६ नोव्हेंबरपर्यंत अनिल देशमुखांना ईडी कोठडीत ठेवण्यात निर्देश दिले आहेत.