एक नवीन संकल्प घेऊन ‘एमटीडीसी’ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज   

0

मुंबई – विविध धार्मिक स्थळे, निसर्गाचे वरदान लाभलेली संपदा, गडकिल्ले, ओसंडून वाहणारे धबधबे, नद्या, सागरी किनारे, नागमोडी वळणे असलेले घाट, पारंपरिक संस्कृती, खाद्यसंस्कृती अशा वैशिष्ट्यांमुळे आज महाराष्ट्रामध्ये देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटकांचा राबता दिसून येत आहे. सध्या भारतात तसेच जगभर एक उल्लेखनीय अशी संकल्पना राबविली जात आहे, ती म्हणजे जबाबदार पर्यटन!.. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सुद्धा ही संकल्पना राबवून पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ४७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत २० जानेवारी २०२२ पासून महामंडळाच्या अखत्यारितील पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स तसेच अभ्यागत केंद्रांमध्ये जबाबदार पर्यटनाची आवश्यकता आणि महत्व लक्षात घेऊन या संकल्पनेची पुरेपूर अंमलबजावणी करण्याची सूचना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांनी दिल्या आहेत.

पर्यटनाचे सकारात्मक परिणाम वाढवण्याकरिता तसेच नकारात्मक परिणामांना आळा घालण्याकरिता, एक साधा आणि वाखणण्याजोगा उपाय म्हणजे जबाबदार पर्यटन, जे आज जगभरात अनेक ठिकाणी स्वीकारले गेले आहे. सर्व भागीदारांमध्ये जबाबदार पर्यटन स्वीकारण्याच्या दृष्टीने जागृती निर्माण करणे हा या संकल्पनेचा मूळ उद्देश आहे. पर्यटनाबरोबरच आपण ज्या भूतलावर वास करतो, त्या वसुंधरेचे आणि परिसराचे जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यासाठी जबाबदार पर्यटन ही संकल्पना काळाची गरज बनली आहे. आपल्या परिसरामध्ये होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्याची विल्हेवाट लावणे ही पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी आहे. पर्यटक निवासांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यात येऊन शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्याची विल्हेवाट लावण्यात येते. वेळोवेळी स्वच्छता अभियान, प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण, स्वच्छतेचे महत्व समजावून देणारे संदेश यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या पर्यटक निवासे, उपहारगृहांमध्ये कार्यरत कर्मचारीवर्ग हे आसपासच्या परिसरातील आणि स्थानिक आहेत.स्थानिकांना रोजगार आणि योग्य प्रशिक्षण देऊन एमटीडीसी त्यांच्या आर्थिक कल्याणास समर्थन देते आणि यातून स्थानिक नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे. महामंडळाच्या उपहारगृहांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिले जाणार असून मन तृप्त करणारे स्थानिक खाद्यपदार्थ सुचविण्यात येऊन पर्यटकांना स्थानिक पाककृतीच्या चवींचा आणि विशिष्टतेचा आनंद देण्यात येणार आहे.

पर्यटकांची काळजी घेणे हे महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. पर्यटक निवासाच्या परिसरात ठिकठिकाणी फलक लावणे, अतिथी पर्यटक निवासामध्ये दाखल झाल्यावर सुरूवातीलाच पर्यावरण प्रेमी म्हणून काय करावे-काय करू नये याबद्दल सांगणे याबरोबरच राहण्याची सोय, चविष्ट जेवण एवढीच आदरातिथ्याची व्याख्या न ठरवता त्याला सुरक्षित, जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाची जोड देण्यात येणार आहे. पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब तसेच अभ्यागत केंद्रांमध्ये जबाबदार पर्यटन ही संकल्पना राबवून विकासाच्या दिशेने एक पाऊल टाकत नवीन सुरूवात करण्यात येणार आहे.

एमटीडीसीद्वारे आज ३० पर्यटक निवासे, २९ उपहारगृहे तसेच बोट क्लब्स आदींचे परिचालन करण्यात येते. महामंडळाच्या अखत्यारीतील महाबळेश्वर येथील पर्यटक निवासात जबाबदार पर्यटन ही परियोजना राबविण्यात येत आहे. आरोग्यास अपायकारक असे रासायनिक व कृत्रिमरित्या बनविलेले पदार्थ पर्यटकांना न देता पर्यटकांचे आरोग्य चांगले राहिल असे पदार्थ देण्याकडे महामंडळ कटाक्षाने लक्ष देणार असल्याचे महामंडळाचे उप महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले.

महामंडळाने जबाबदार पर्यटनाच्या दिशेने यापूर्वीही पावले उचलली आहेत. तथापि पर्यटकांच्या अमूल्य योगदानाचीही आवश्यकता आहे. जबाबदार पर्यटन संकल्पनेच्या माध्यमातून वसुंधरेचे रक्षण करण्याचे एक महत्वपूर्ण काम आपल्या हातून घडणार आहे. याद्वारे पर्यावरणाप्रती जबाबदारी सुयोग्यरित्या पार पाडण्यास आपण समर्थ ठरू, असे प्रतिपादन महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.