मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वतः ट्विट करून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.
आपल्या ट्विट मध्ये शरद पवार यांनी म्हटलं आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि रेवती सुळे यांना कोरोना संसर्ग झाला होता.
राज्य महिला आयोगाच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ जानेवारीला मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना कोरोना संसर्ग झाल्यानं ते अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022