नाशिक – नाशिककरांना हादरवून टाकणाऱ्या डॉ. सुवर्णा वाजेचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय बळावला असला तरी प्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे.विल्होळी नजीक मुंबई-आग्रा राेडवरील रायगड नगरजवळ जळालेल्या अवस्थेत आढळून आलेला सांगाडा बेपत्ता डाॅक्टर सुवर्णा वाजे यांचाच असल्याचे फाॅरेन्सिक डिपार्टमेंटच्या ‘डीएनए’ अहवालावरुन आता स्पष्ट झाले आहे.
जळालेल्या अवस्थेत सापडलेला सांगाडा बेपत्ता डाॅ. सुवर्णा वाजे यांचाच आहे की अन्य दुसऱ्या महिलेचा याबाबत गूढ वाढले होते. दरम्यान, हे पडताळण्यासाठी ‘डीएनए’ अहवाल लवकरात लवकर ग्रामीण पाेलिसांना द्यावा, असे पत्र पाेलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी गेल्या दाेन दिवसांपूर्वीच दिंडाेरी राेडवरील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयाेगशाळेला (फाॅरेन्सिक) पाठविले हाेते. अखेर काल हा अहवाल वाडीवाऱ्हे पाेलिसांना प्राप्त झाला असून त्यात जळालेला सांगाडा डाॅ. सुवर्णा यांचाच आहे, असे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. माहेरच्या नातेवाईकांनीही त्यांना काही माहिती दिल्याचे समजते. डॉ. वाजे यांच्या पतीकडूनही माहिती घेण्यात आली आहे. दुसरीकडे पोलिसांनी डॉ. सुवर्णा वाजे यांची गाडी जाळण्यासाठी संशयिताने कोणत्या ज्वलनशील पदार्थाचा वापर केला, याचा शोध सुरू केला आहे. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यातले फुटेजही तपासण्याचे काम सुरु आहे.
डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी चांगली कामगिरी बजावली. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. विशेष म्हणजे २५ जानेवारी रोजी, मंगळवारी सायंकाळीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही टेन्शन नव्हते. मात्र,अचानक असे काय घडले, याचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या घटनेला १० दिवस पूर्ण झाले असून पाेलिस दाेन-तीन दिवसात अंतिम निष्कर्षापर्यंत पाेहाेचतील.असे वाडीवाऱ्हे पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक अनिल पाेवार यांनी सांगितले आहे.