ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन

शिवाजी पार्कात लतादीदींवर अंत्यसंस्कार होणार 

0

मुंबई – ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८.१५ वाजता वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला . गेल्या २८ दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. यादरम्यान त्यांना अनेकदा जनरल वॉर्ड आणि आयसीयूमध्ये ठेवण्यात आले . नुकतेच त्यांना आयसीयूमधून हलवण्यात आले होते, मात्र काल सकाळपासून त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले.

लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशभरात तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. तसेच या दोन दिवसात देशात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज  लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.संध्याकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. यावेळी त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात येईल. त्यानंतर अंत्यसंस्कारापूर्वी सशस्त्र जवान त्यांना सलामी देतील.

लता मंगेशकर कोरोनाची लागण झाल्याने आणि न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना ८ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ प्रतित समदानी आणि त्यांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होती आणि त्यांच्यावर उपचार करत होते. काही दिवसापासून त्या उपचारांना प्रतिसाद देत होत्या मात्र कालपासून त्यांची प्रकृती खालवली आणि आज सकाळी त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.

भारतरत्न लता मंगेशकर या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका होत्या, ज्यांचा सात दशकांचा कार्यकाळ यशाने भरलेला आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. भारतातील ‘स्वरसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांनी २० भाषांमध्ये ३०००० गाणी गायली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी लतादीदींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

स्वर युगाचा अंत झाला,मातृतुल्य आशीर्वाद हरपला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.

ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.

लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?

“त्यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू  होती”: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे.  हा दिवस अटळ आहे हे माहिती असून देखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते.भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते.

आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाई गीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती.अभिजात भारतीय संगीत सुलभ करून लतादीदींनी ते समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविले. आपल्या दैवी स्वरांनी त्यांनी असंख्य जनसामान्य, शेतकरी तसेच  कष्टकरी लोकांना सकारात्मक जीवन जगण्याची नित्यनवी उमेद, ऊर्जा व उत्साह दिला.लतादीदी या तब्बल आठ दशके भारतीय चित्रपट सृष्टीची ओळख होत्या.  चित्रपट व संगीत सृष्टीच्या सुवर्ण काळातील साक्षात हिरकणी होत्या.

भारतरत्न लतादीदी महाराष्ट्राच्या कन्या होत्या याचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्या आपल्या जीवनकाळात झाल्या हे आपले सद्भाग्य होते.लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला आहे. त्यांचा दैवी स्वरदीप मात्र मनामनात तेवतच राहील.या दुःखद प्रसंगी संपूर्ण राज्याच्या वतीने लतादीदींना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना आशाताई, उषाताई, मीनाताई, पं. हृदयनाथ तसेच संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांना कळवतो.

लतादीदींच्या देशविदेशातील करोडो चाहत्यांना देखील आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

“‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादिदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे.

लतादिदींच्या जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादिदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

“लतादिदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संगीतकलेचा गौरवशाली वारसा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादिदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादिदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. संगीतक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवलं. ‘आद्वितीय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली.

भारतीय, जागतिक संगीतक्षेत्र समृद्ध केलं. देव आणि स्वर्ग आहेत की नाही ते माहित नाही, परंतु लतादिदींमध्ये अनेकांनी देव पाहिला. त्यांच्या सूरांनी रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभुती दिली. लतादिदींनी सामाजिक बांधिलकीही जाणीवपूर्वक जपली. 1962 च्या चीनविरुद्धच्या युद्धात शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेल्या ‘ये मेरे वतन के लोगो…’ गाण्यानं तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पंडित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या क्षेत्रातले त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.

विश्वरत्न, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लतादिदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचं निधन ही महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी आहे. लतादिदींचं नसणं कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. मी लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबियांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत लतादिदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

थम गया सुरों का कारवां, लतादीदींच्या निधनाने संगीतातले एक पर्व संपले – छगन भुजबळ

लतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून दिदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले असल्याच्या भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोकसंदेशात मंत्री छगन भुजबळ म्हणतात की लता मंगेशकर म्हणजे संगीतातील पूर्णविराम. त्याच्या गायनाने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील संगीतप्रेमीं मंत्रमुग्ध होत असत. म्हणूनच त्यांना संगीतातील गानसरस्वती म्हटले जायचे. आज लतादीदी यांचे निधन झाले असले तरी संगीताच्या माध्यमातून त्या कायमच अजरामर राहतील.

“नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा  मेरी आवाज़ ही पहचान है ग़र साथ रहे… !” लतादीदी यांनी गायलेल्या या गाण्याप्रमाणे आज शरीराने जरी त्या नसल्या तरी त्यांचे स्वर कायम आपल्यात राहतील. लतादीदी यांच्या निधनाने मंगेशकर कुटुंबियांवर व संगीतप्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर त्यांच्या  मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना देखील छगन भुजबळ यांनी केली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना विश्वास जयदेव ठाकूर यांची श्रद्धांजली

आपल्या सुमधुर स्वरातून जगाला आनंद देणाऱ्या लता दीदी दैवी स्वर होता,मानवी भावभावनांचे ,जीवनातील अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या गायलेल्या गीतातून येते.जगभरात भारतीय संगीत परंपरा घेऊन जाण्याचे महत्वाचं काम लता दीदींनी केले.हिंदी,मराठी चित्रपटातील गीतांची मोहिनी त्यांनी जगावर घातली आणि एक सुवर्णयुग निर्माण झाले व आपल्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग झाला.त्यांच्या आवाजाच्या असामान्य  लवचिकपणामुळे, अलौकिक सुरांमुळे चित्रपट-संगीतकारांना नवनवीन प्रयोग करता येणे शक्य झाले व परिणामी  संगीताच्या कक्षा व सौंदर्य वाढले. वीसहून अधिक भाषेत त्यांनी गायन केले आणि सुरांच्या कक्षा रुंदावल्या त्यातूनच संगीतातील एकात्मता त्यांनी जपली.एक स्वरांचे युग संपले आहे.  पु. ल.देशपांडे म्हणाले होते जगात चंद्र, सूर्य, व लता आहे ते खरंय. त्यांनी गायलेल्या गीतांचा अनमोल वारसा आहे तो जपुया, जतन करूया हीच  भावपूर्ण श्रद्धांजली…

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!