शिवसेना नेते सुधीर जोशी यांचं निधन

0

मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी,मुंबईचे दुसरे महापौर,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं आहे.दीर्घकाळापासून आजारी होते. त्यातूनच आज मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं.

सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी बाळासाहेबांसोबत उल्लेखनीय काम केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसमवेत काम करत असलेले सुधीर जोशी १९७३ मध्ये मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री ही पदेही त्यांनी भूषवली आहेत.

सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. सुधीर जोशी हे १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. ते १९६८ पासून विधान परिषद सदस्य होते. ते १९९२-९३ या दरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करुन त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला.

युतीच्या सरकारात ते जून १९९५ ते मे १९९६ या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर १९९६ ते १९९९ पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.

संगीत, क्रिकेट व समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम सुधीर यांच्या जीवनात पाहायला मिळतो. ते त्यांच्या ‘आपुलकी’ या मोठ्या गुणामुळे गुणीजनांत आणि समाजात अतिशय आपलेसे झाले आहेत. त्यामुळेच स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजेच सुधीर जोशी हे समीकरण पक्के झाले,

सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेब ठाकरेंनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. बाळासाहेबांनी त्यांच्यावरील टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला होता. बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी राहिले आहेत.

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना शोक

मराठी भूमिपुत्रांच्या हक्कांना आवाज देणारा सच्चा शिवसैनिक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार

मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांना आवाज देणारा सहृदयी नेता सुधीर जोशी यांच्या निधनामुळे गमावला आहे. त्यांच्यासारखे व्रतस्थ आणि निष्ठावान असे उदाहरण आता दुर्मीळ झाले आहे, अशा शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केल्या आहेत. दिवंगत सुधीरभाऊंनी मुंबईचे महापौर आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून दिलेले योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी श्रद्धांजलीही दिवंगत जोशी यांना अर्पण केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ते पहिल्या फळीतील निष्ठावान शिवसैनिक होते, त्यांच्या निधनाने शिवसेना एका सच्चा शिवसैनिकाला मुकली आहे. सुधीरभाऊंच्या जाण्याने माझी वैयक्तिक हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकभावनेत नमूद केले आहे.दिवगंत ज्येष्ठ नेते जोशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, कार्यकर्त्याचा पिंड आणि जनसामान्यांबद्दल प्रचंड कळवळा असल्यानेच दिवंगत सुधीरभाऊंनी शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांना आवाज देण्याचा लढा उभारला. शिवसेनाप्रमुखांसाठी ते पहिल्या फळीतील निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांच्या राजकारण आणि समाजकारणातील समतोल साधण्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे सुधीरभाऊ अखेरपर्यंत काम करत राहीले. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक कामगार, कर्मचारी संघटनांची त्यांनी उत्कृष्ट बांधणी केली.

या संघटनेमुळेच मराठी भूमिपुत्रांना अनेक रोजगार, नोकऱ्यांच्या उत्तमोत्तम संधी मिळविता आल्या. शिवसेनेचा मुंबईचा महापौर म्हणूनही त्यांनी मराठी माणसाचा आवाज बुलंद केला. जी-जी संधी मिळेल, त्याचे सुधीरभाऊंनी आपल्या धडाडीने सोने केले. सामान्य माणसांना, कष्टकरी-कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मदत करण्यात ते सातत्याने आघाडीवर होते. विधिमंडळात पोहचल्यावरही त्यांनी आपल्या अभ्यासू मांडणीने आणि अंगभूत हुशारीने अशाच प्रश्नांची मांडणी केली. त्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवत, अनेकांना न्याय मिळवून दिला.

राज्याचे महसूल मंत्री, शिक्षण मंत्री म्हणूनही त्यांना संधीही त्यांनी मिळाली. याठिकाणीही त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कामाचा ठसा उमटवला. सुधीरभाऊ अखेरपर्यंत सामान्यांसाठी झटणारे निष्ठावंत कार्यकर्ते-नेतृत्व राहीले. त्यांच्या निधनामुळे मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांना आवाज देणारा सहृदयी असा नेता आपण गमावला आहे.  हा आघात सहन करण्याची त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी, ही ईश्वर चरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 सुधीर जोशी उत्तम संघटक, अभ्यासू नेते : राज्यपाल

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मंत्री तसेच मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.श्री सुधीर जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. श्री जोशी उत्तम संघटक तसेच अभ्यासू व लढवय्ये नेते होते. कामगार तसेच स्थानिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. मुंबईचे महापौर, विधान परिषद सदस्य, विरोधी पक्षनेते व राज्याचे मंत्री या नात्याने त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

सुधीर जोशी यांच्या निधनाने एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व गमावले- मंत्री छगन भुजबळ

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मुंबईचे माजी महापौर आणि माजी मंत्री सुधीर जोशी यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व गमावल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

शोकसंदेशात छगन भुजबळ म्हणतात, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी असलेल्या सुधीर जोशी यांच्या निधनामुळे एक अत्यंत मितभाषी शांत आणि सुस्वभावी असे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची भूमिका नेहमीच महत्वाची राहिलेली आहे. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात पक्षबांधणीसाठी सुधीर जोशी यांचे मोठे योगदान होते.त्यांनी मुंबई शहराचे महापौर तसेच युतीसरकारच्या काळात शिक्षणमंत्री आणि महसूलमंत्री पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.महसूलमंत्री असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागले.

मुंबईतील मोठमोठ्या कंपन्या आणि बँकांमध्ये मराठी तरूणांना नोकऱ्या मिळाव्या यासाठी स्थानिक लोकाधिकार समिती निर्माण करण्यात आली होती. ही स्थानिक लोकाधिकार समिती मोठी करण्यामध्ये त्यांचे योगदान होते.सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने आणि शिवसेनेने एक चांगला नेता गमावला आहे.

सुधीर जोशी यांच्या निधनाने जोशी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय जोशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!